युवकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:31+5:302021-06-28T04:20:31+5:30
सडक-अर्जुनी : संपूर्ण विश्व आज कोरोना महामारीच्या सावटाखाली जगत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी बचावासाठी ...
सडक-अर्जुनी : संपूर्ण विश्व आज कोरोना महामारीच्या सावटाखाली जगत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी बचावासाठी लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय आहे. अशिक्षितपणामुळे लसीकरणाला घेऊन उलट-सुलट अफवा व गैरसमजुती पसरल्यामुळे काही नागरिक लसीकरणासाठी टाळाटाळ करीत आहेत. ही टाळाटाळ केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि किंबहुना समाजासाठी देखील जीवघेणी ठरू शकते. समाजाला अफवांपासून दूर करून लसीकरणासाठी प्रत्येक कुटुंबातील युवकांनी पुढाकार घ्यावा, १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम सौंदड येथील सरपंच गायत्री इरले यांनी केले.
त्यांनी, प्रत्येक कुटुंबात एकतरी सुशिक्षित युवक आहे, जो घरासह शेजारील लोकांना आणि गावकऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. अशा प्रकारे युवकांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सहजरीत्या लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. कुटुंब, समाज आणि देश सेवा करण्याची संधी युवकांनी सोडू नये. या पुण्य कार्यात हिरिरीने सहभागी व्हावे आणि देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. गावातील सर्व महिला, पुरुष, युवक-युवतींनी आधी स्वतः लस घ्यावी आणि नंतर इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.