वनविभागाची रोपे आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 01:06 AM2017-06-21T01:06:23+5:302017-06-21T01:06:23+5:30
शासनाने लोकसहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.
प्रत्येक तालुक्यात स्टॉल : सवलतीच्या दरात मिळणार रोपे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने लोकसहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. गोंदिया जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी वन विभागाने रोपे आपल्या दारी ही योजना आखली असून विविध ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विविध जातीची रोपे सहज उपलब्ध व्हावी यासाठी २५ ते ३० जून या कालावधीत आपल्या दारी ही योजना राबविली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत तालुका गोंदिया व गोरेगाव करीता वन विभागीय कार्यालय गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व गोठणगाव करीता वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव, आमगाव व सालेकसा करीता वनउपज तपासणी नाका आमगाव, सडक-अर्जुनी, कोहमारा, नवेगावबांध महामार्गकरीता वनपरिक्षेत्र कार्यालय वन्यजीव विभाग कोहमारा राष्ट्रीय महामार्ग तसेच तिरोडा करीता वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा या ठिकाणी हे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
या स्टॉलवर रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात गुलमोहर, अशोका, पेल्टाफार्म, बाहावा, करुकरंज, रेन्ट्री, सप्तपर्णी, जारूळ ही रोपे ११ रुपये प्रती रोपे तसेच बदाम, सीताफळ, कवठ, बोर, पेरु, रामफळ, मुंगना, चिंच, आवळा, बेहडा, मोहा ही रोपे ६ रुपये प्रती रोपे तसेच बांबू व सागवन रोपे ७ रुपये प्रती रोपे दराने उपलब्ध राहणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने नागरिकांना हरितसेना सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी आपले ओळखपत्र सोबत घेवून स्टॉलवर संपर्क साधावा. तसेच रोपे कुठे लावायची आहेत याची माहिती द्यावी, रोपे आपल्या दारी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे.