विनयभंग प्रकरणात तरुणाला चार वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:49+5:302021-02-19T04:18:49+5:30
गोंदिया : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने आरोपी तरुणाला चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार ...
गोंदिया : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने आरोपी तरुणाला चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आमगाव येथे २०१५ मध्ये हे प्रकरण घडले होते.
सविस्तर असे की, आरोपी मनोज नवगडे (वय २७, रा. आमगाव) याने २०१५ मध्ये शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा रात्री आठ वाजता विनयभंग केला होता. त्यावेळी पीडितेने ओरडून त्याचा प्रतिकार केला व यासंदर्भात आरोपी विरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ८, भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव पवार यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप सादर केले होते. हे प्रकरण अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष पोक्सो जलदगती न्यायालय) सुभदा डी. तुळणकर यांच्याकडे सुरू होते.
या प्रकरणात अभियोजन व फिर्यादी पीडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी आरोपी विरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी एकूण १२ साक्षीदार न्यायालयाने तपासले. दोन्ही पक्षांच्या दीर्घ युक्तिवादानंतर या प्रकरणात अभियोजन पक्षाचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरून गुरुवारी (दि. १८) आरोपीला कलम ८ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ अंतर्गत चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी बावनकर व महिला पोलीस शिपाई सुनीता लिल्हारे यांनी काम बघितले.