युवकांनी समाजहितासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:19+5:302021-04-02T04:30:19+5:30
बोंडगावदेवी : जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व प्रजेच्या सुखा - समाधानाला प्राधान्य दिले जात होते. महिला वर्गाचा ...
बोंडगावदेवी : जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व प्रजेच्या सुखा - समाधानाला प्राधान्य दिले जात होते. महिला वर्गाचा सन्मान राखला जात होता. महाराजांचे लोकहितार्थ विचार आजच्या युवा पिढीने अंगिकारावे. शिवाजी महाराजांना डोक्यात घेणे गरजेचे आहे. सामान्य जनतेवर अन्याय होऊ न देता प्रजा सदैव आनंदी राहण्यासाठीच त्यांनी आपले कर्तव्य पणाला लावले. समाजाची भिस्त युवकांवर आहे. सामाजिक बांधिलकीचे व्रत अंगिकारुन युवा पिढीने समाजहितासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन विलास गायकवाड यांनी केले.
जवळील ग्राम निमगाव येथील नवशक्ती युवा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. गावातील शिवाजी चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते लहू नाकाडे, ग्रामसेवक संतोष परमार, लोमेश गहाणे, रवी मेश्राम, पुरुषोत्तम बन्सोड, किशोर राऊत, दीपक निमजे, दिनेश नाकाडे उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय गायकवाड यांनी केले, तर दिनेश नाकाडे यांनी आभार मानले.