युवकांनी स्वत:ला मर्यादित ठेवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:18 PM2019-03-27T22:18:42+5:302019-03-27T22:19:11+5:30
युवकांनी स्वत:ला मर्यादीत न ठेवता आलेल्या संधीचे सोने करावे.स्पर्धेच्या युगात युवकांना रोजगाराची संधी मिळेल ती हातून जाऊ देऊ नये, अन्यथा माझे जे स्वप्न आहे, मला जे हवयं ते मिळाल्याशिवाय मी दुसरी नोकरी करणारच नाही अशा दृष्टिकोन असणाऱ्या युवकांना नंतर पश्चाताप किंवा मनस्तापाला सामोरे जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : युवकांनी स्वत:ला मर्यादीत न ठेवता आलेल्या संधीचे सोने करावे.स्पर्धेच्या युगात युवकांना रोजगाराची संधी मिळेल ती हातून जाऊ देऊ नये, अन्यथा माझे जे स्वप्न आहे, मला जे हवयं ते मिळाल्याशिवाय मी दुसरी नोकरी करणारच नाही अशा दृष्टिकोन असणाऱ्या युवकांना नंतर पश्चाताप किंवा मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य करिअरचे नियोजन करुन यशाचे शिखर गाठावे असा सल्ला पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी दिला.
तिरोडा विद्युत प्रकल्पाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर पोलीस उपअधीक्षक नितीन यादव, स्टेशन हेड सी.पी. साहू, अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर उपस्थित होते. सी.पी.साहू यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सकारात्मक दृष्टीकोण व ध्येय निश्चितीच्या जोरावर जे हवय ते प्राप्त करता येते व त्यासाठी संयम ठेवित निरंतर प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवकांच्या भविष्यासाठी अदानी फाऊंडेशन विविध उपक्रम राबवित असून यापुढे ही आमचे प्रयत्न आम्ही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून युवकांना पोलीस व सैन्य भरतीकरिता आवश्यक असणारी तयारी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जात आहे. दररोज सकाळी दोन तास मैदानावर शारीरिक तयारी, आठवड्यातून दोन दिवस थेअरी क्लास व प्रत्येक शनिवारी १०० मार्काचा पेपर अशी संपूर्ण तयारी चार महिन्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांकडून करुन घेण्यात आली. यासाठी गोंदिया पोलीस विभाग सुद्धा सहकार्य करीत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विनीता शाहू व सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
संचालन अदानी फाऊंडेशनचे राहूल शेजव तर आभार प्रिती उके यांनी मानले.कार्यक्रमासाठी सुरक्षा विभागाचे गजेंद्र शेखावत, पोलीस विभागाचे वसीम खान, अख्तर शेख, प्रशांत कावळे, अर्शद पठान व अदानी फाऊंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.