बंदोबस्ताला आलेले जवान उपाशीच परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:08 AM2019-04-14T06:08:37+5:302019-04-14T06:09:07+5:30
१५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.
गोंदिया : भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या गट १५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. परंतु मतदान झाल्यानंतर त्यांना जेवणही न देता त्यांना उपाशीपोटी लगेच परत पाठविण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जवांनानी मतदानाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवत कुठलीही चुक होऊ नये, याकरीता सतर्कतेने काम केले. त्यानंतर ११ एप्रिलला मतदान संपल्यानंतर लगेच ६ वाजताच पुणे येथे बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या जवानांना रवाना करण्यात आले. बोरगाव कँप येथे ५ मिनिटांचीही विश्रांतीही घेऊ दिली नाही. तातडीने पुणे ग्रामीण बंदोबस्तासाठी निघण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी जवांनाना रात्रभर उपाशी प्रवास करण्याची वेळ आली. कारंजा लाड येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोहचताच थोडा वेळ जवांनानी तेथील एका पेट्रोलपंपावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास प्रात:विधी करण्यास अधिकाऱ्यांनी वेळ न देताच ६ वाजेच्या सुमारास पुण्याकडे पोलीस वाहन निघाले. ११ एप्रिलला सायकांळी ६ वाजता निघालेल्या जवांनाना १३ एप्रिलला दुपारी १ वाजेपर्यंत नाष्टा किंवा जेवण उपलब्ध करून दिले गेले नाही. ३ दिवस झोप न झाल्याने आमची प्रकृती बिघडली असल्याची जवानांची भावना असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
>सर्व जवांनाना आम्ही फूड पॅकेट दिले होते. जेवण दिले नाही, अशी कुणाचीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. परंतु सोशल मीडियावरून चाललेल्या प्रकारावरून त्या कंपनीचे कमांडंट जावेद अन्वर यांच्याशी चर्चा केल्यावर अशा प्रकारची कसलीही तक्रार नसून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक, गोंदिया
>मी घाबरत नाही
सोशल मीडियाद्वारे जवानांनी गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. जवांनाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था न करताच नायक पोलीस उपनिरिक्षक विश्वास हे रजेवर निघून गेले. परिस्थितीची जाणीव करु न दिल्यानंतरही त्यांनी मी कुणाला घाबरत नाही, असे म्हटल्याचे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नमूद केलेले आहे.