लावलेल्या निर्बधांवर कारवाई शून्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 AM2021-03-17T04:30:18+5:302021-03-17T04:30:18+5:30
गोंदिया : राज्यात कोरोनाचा भडका उडत असताना राज्य शासनाकडून आता नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत ठरवून दिल्याप्रमाणे ...
गोंदिया : राज्यात कोरोनाचा भडका उडत असताना राज्य शासनाकडून आता नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत ठरवून दिल्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंड व कारवाईचे अधिकार यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील हॉटस्पाट असलेल्या गोंदिया शहरातील चित्र बघता या निर्बंधावर कारवाई शून्यच दिसून येत आहे. परिणामी सर्व काही पूर्वीप्रमाणे बिनधास्त सुरू असून, यामुळेच कोरोनाला फोफावण्यासाठी पूरक वातावरण मिळत आहे.
मागील वर्षी कोरोना देशात शिरला व सर्वाधिक कहर महाराष्ट्रात केला होता. राज्याची अवघी व्यवस्थाच या कोरोनाने हेलावून सोडली होती. त्यात आता पुन्हा कोरोना फोफावत असून, यातही महाराष्ट्र राज्य यंदाही अव्वलच ठरत आहे. त्यानंतरही मात्र राज्य शासनाकडून निर्बंधांवरच हा गंभीर विषय हाताळला जात असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचा भडका उडाला असतानाच आता जिल्ह्यातही कोरोना आपले डोके वर काढत आहे. कधी १-२ वर आलेली बाधितांची संख्या आता ५० च्या घरात पोहोचली आहे. यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांवर एक आदेश काढला आहे, तसेच ठरवून देण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन होत असल्यास कारवाईचे अधिकार शासकीय यंत्रणेला दिले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेकडून अशात कारवायाच होत नसल्याने नागरिकही परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्यास तयार नाहीत. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नसोहळे त्याच धडाक्यात आटोपले जात आहेत. व्यवसायी न नागरिक कुणीही मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. शिवाय शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचे उघडपणे दिसत असूनही जबाबदार अधिकारी मैदानात उतरून कारवाई करताना दिसून येत नाही.
--------------------------------
गोंदिया तालुक्यात परिस्थिती कठीण
कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासूनच गोंदिया शहर व तालुका हॉटस्पाट आहे. आजही जिल्ह्यातील २७८ बाधितांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त बाधित १७५ बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत. अशात तालुक्यात अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, तसे काहीच दिसत नसून नागरिक कुणाचेही ऐकण्यास तयार नसतानाच त्यावर अंकुश बसविण्यासाठी यंत्रणाही पुढाकार घेताना दिसत नाही.
--------------------------
आता तरी मैदानात उतरण्याची गरज
नागपूरमध्ये कोरोनाचा दररोज स्फोट होताना दिसत असून, शेजारच्या भंडारा जिल्ह्यातही आता परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. अशात जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शासन व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र, आवाहनावरून नागरिक वागले असते तर मागील वर्षीच कोरोना देशात पसरला नसता. अशात कारवायांशिवाय नागरिकांत गांभीर्य येणार नसल्याने यंत्रणेने आता मैदानात उतरण्याची गरज असल्याचे खुद्द सुज्ञ नागरिक बोलत आहेत.