जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:34+5:30
२२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचालय या सर्वांची स्वच्छता करून शाळेचा कायापालट करून टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुजरुक : परराज्य व जिल्ह्यातून आल्याने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या चार तरूणांनी शाळेचा कायापालट करून टाकला. माजी विद्यार्थी असलेल्या चार जणांनी आपल्या क्वारंटाईन कालावधीचा सदुपयोग केला असून या कार्यातून त्यांनी आपल्या गाव व शाळेचे ऋण फेडले.
शनिवारी (दि.२३) पुणे, रायगढ व बंगलोर येथून चार तरूण गावात दाखल झाले. खबरदारीचा इशारा म्हणून त्यांना गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण करण्यात आले. २२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचालय या सर्वांची स्वच्छता करून शाळेचा कायापालट करून टाकला. ‘लोकमत’ प्रतिनिधी ने आज शाळेला भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आम्ही या शाळेत शिकत असताना झाडे लावून स्वच्छता करीत होतो. परंतु आम्ही शाळा सोडून गेलो तेव्हापासून आमचे लक्ष या शाळेकडे नव्हते. परंतु कोरोनामुळे आम्हाला ही संधी लाभली. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्याची हीच योग्य वेळ होती.
शाळेत यावे शिक्षणासाठी व निघावे सेवेसाठी ही म्हण आम्हाला आठवली व त्यातूनच आम्हाला शाळेसाठी काही तरी करता आले याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगीतले. मुख्याध्यापक के.जे. शरणागत, सरपंच प्रभा अंबुले, उपसरपंच दिनेश पटले, माजी उपसरपंच मुरलीदास गोंडाने, पोलीस पाटील हितेश सोनेवाने, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.