व्हॉटस अॅपच्या संदेशावरून जि.प. पदाधिकाऱ्यांत जुंपली
By admin | Published: July 6, 2016 02:05 AM2016-07-06T02:05:33+5:302016-07-06T02:05:33+5:30
जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आपली बदनामी ...
गोंदिया : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (दि.५) गंगाधर परशुरामकर यांचा जबाब नोंदविला.
जिल्हा परिषद सदस्यांचा एक ग्रुप व्हॉट्सअॅपवर तयार करण्यात आला आहे. त्या ग्रुपवर परशुरामकर यांनी आपल्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याची तक्रार गहाणे यांनी केली. मात्र त्यांचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आपण प्रचलित असलेल्या वाक्प्रचाराचा साध्या अर्थ्याने वापर केला होता, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचे परशुरामकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेतील काही बांधकामे अडल्यामुळे जि.प. उपाध्यक्षांनी चिडून ही तक्रार केल्याचे काही जि.प. सदस्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दिड कोटीचे काम व जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०५४ या शिर्षाखालील ३ कोटी ४० लाखांचे काम विभाग प्रमुखांनी मंजूर केले. ही कामे विषय समिती, स्थायी समिती किंवा सामान्य सभेत न ठेवताच मंजूर करण्यात आली. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०१५ ला शिक्षणाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी मान्यता दिली. २९ जानेवारी २०१६ ला मंजूर झालेली कामे सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आली. आधी त्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर त्या कामांना सर्वसाधारण सभेत मांडले. त्यावर आक्षेप घेत जि.प. सदस्य सुरेश हर्ष व इतरांनी तक्रार केली होती. त्यावर मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता.
१२ जून रोजी झालेल्या सभेत विभाग प्रमुखांना खडसावत असले प्रकरण खपवून घेणार नाही. त्यासाठी अशी चूक पुन्हा करू नका, असे निर्देश स्थायी समितीच्या सभेत सीईओंनी विभाग प्रमुखांना दिले. या प्रकरणाची पडताळणी करण्यास अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पाडवी यांना सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानंतर जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे हे मुकाअ यांच्या कक्षात चर्चा करण्यासाठी गेले. त्यावर परशुरामकर यांनी व्हॉट्सअॅपवर कॉमेंट केल्याने सत्ताधारी आणि विरोधक पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. (तालुका प्रतिनिधी)