झाडीपट्टीच्या कलावंतांना लागले नाटकांचे वेध
By admin | Published: October 4, 2015 02:34 AM2015-10-04T02:34:50+5:302015-10-04T02:34:50+5:30
विदर्भाची शान, मान आणि नाट्य कंपन्यांची खाण म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे. दरवर्षी दिवाळीपासून झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांना सुरुवात होते.
मंडईची तयारी : नाटक कंपन्या लागल्या कामी
बाराभाटी : विदर्भाची शान, मान आणि नाट्य कंपन्यांची खाण म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे. दरवर्षी दिवाळीपासून झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांना सुरुवात होते. त्यासाठी झाडीपट्टीच्या रंगभूमीला नाटकांचे वेध लागणे सुरू झाले आहे. तालीम, सराव आणि नाटकांची झलक म्हणून या नाट्य कंपन्यांच्या नाटकांना हळूहळू रंग चढत आहे.
सदर झाडीपट्टी रंगभूमी ही ‘झाडीवूड’ या नावाने प्रसिद्ध आहे. गडचिरोली-चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील वडसा/देसाईगंज या शहरात झाडीपट्टी नाटकांच्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. ५०-६० नाट्य कंपन्यांची कार्यालये येथे सजली आहेत. यामध्ये चंद्रकला थिएटर्स, लोकजागृती रंगभूमी, चक्रधर स्वामी, धनंजय स्मृती, प्रशांत स्मृती, नटरंग लावण्य, प्रल्हाद रंगभूमी, रंगतरंग युवा रंगमंच, नटराज, महालक्ष्मी अशा कंपन्या सर्वपरिचित आहेत. सदर कंपन्यांची रंगीत तालीम, सराव करताना झाडीपट्टीतील कलाकारही येथे दाखल झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
भावगीत, प्रेमगीत, चरित्र अभिनय, हास्य अभिनव अशा विविध भूमिकांमध्ये अभिनय करण्यासाठी कलावंत पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती अशा मोठ्या शहरातून येत असतात. नृत्य करणाऱ्या तरुणीसुद्धा हजेरी लावताना दिसतात. या झाडीपट्टी नाटकांना खरा रंग चढणार तो दिवाळीच्या पर्वावर. दिवाळीपासून मंडई बाजार गावोगावी भरविल्या जातो. याच निमित्ताने या नाट्य कंपन्यांची नाटके प्रबोधनाचे कार्य पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात करतात. यामधूनच शहरातील कलावंतांबरोबर झाडीपट्टीचे कलाकारांना सुगीचे दिवस येते. (वार्ताहर)
झाडीपट्टी कलावंतांची ख्याती महाराष्ट्राभर
झाडीपट्टी रंगभूमीचे कलावंत सुरूवात जरी आपल्या भागातून करीत असले तरी त्यांच्या कलेचे सादरीकरण राज्यात अन्य भागातही आता होत आहे. त्यात प्रामुख्याने अनिरुद्ध वनकर, प्रा.शेखर डोंगरे, स्वर संगमकुमार, के. आत्माराम, डॉ.खुणे, कमलाकर बोरकर, युवराज प्रधान, शेखर पटले, किरपाल सयाम, राजा चिटणीस, ज्ञानेश्वरी कापगते, रागिनी बिडकर, भूमाला कुंभरे अशा प्रतिभावान कलाकार, गायक, लेखक, कवी, दिग्दर्शक, सिनेस्टार्सचा समावेश आहे.