जि.प. व पं.स. निवडणूक : मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, आज कळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 10:35 AM2022-01-19T10:35:49+5:302022-01-19T10:37:09+5:30
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे.
गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतची निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात आली. निवडणुकीचा पहिला टप्पा २१ डिसेंबरला तर दुसरा टप्पा १८ जानेवारीला पार पडला.
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज (दि.१९) सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. यासाठी सरासरी ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीत आपला कौल दिला. जि.प.च्या ५३ जागांसाठी २९४ तर पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी ४६८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्व ७६२ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
सर्वांचे सत्तेचे दावे
एकूण ५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागा जिंकण्याची गरज आहे. जो राजकीय पक्ष २७ जागा जिंकेल तो बहुमताने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल, हे स्पष्ट आहे. मात्र निवडणुकीचे समीकरण आणि लढती पाहता कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्वच प्रमुख पक्षांनी जि.प.मध्ये आपल्याच पक्षाची सत्ता स्थापन करण्याचे दावे केले आहे.
उमेदवारांसह नेत्यांची धाकधूक वाढली
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ७६२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या भाग्याचा फैसला बुधवारी होणार आहे. तर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागली आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, याला घेऊन उमेदवार आणि नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
वर्चस्वाच्या लढाईत कोण होणार पास अन् नापास
स्थानिक राजकारणावरील पकड मजबूत करण्यासाठी जि.प. आणि पं.स.ची निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई होती. यात मतदारराजा आपला कौल कुणाला देऊन पास करतो, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण जागा : ५३
एकूण उमेदवार : २९४
पंचायत समितीच्या एकूण जागा : १०६
एकूण उमेदवार : ४६८