पाणी टंचाईवर झेडपीने झटकले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:08 AM2017-12-04T00:08:25+5:302017-12-04T00:10:21+5:30
भूजल सर्वेक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर आतापासूनच उपाय योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भूजल सर्वेक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर आतापासूनच उपाय योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने हा मुद्दा गांभिर्याने घेतलेला नाही. टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याच्या विषयावर हा विभाग पूर्णपणे बिनधास्त आहे.
जिल्ह्यात साधारणात: ३ सप्टेंबरपर्यंत १३०० मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ६५८ मि. मी. पाऊस झाला. परिणामी तिव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यावर्षी १३०० मि. मी. पेक्षा जास्त पडतो तेव्हाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविते. मात्र यंदाची परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेने यावर आतापासून उपाय योजना करण्याची गरज होती. परंतू अद्यापही या विभागाने पाणीे टंचाई निवारणार्थ कुठलीच उपाय योजना केली नाही.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्ती फंडात काहीच निधी शिल्लक नसल्याने या विभागाचे अधिकारी हातावर हात ठेवून आहेत. जिल्हा नियोजन व विकास मंडळाने यासाठी १ कोटी रुपये उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी प्रकल्प सुध्दा कोरडे पडले आहेत. तर काही गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेही यंदा पाणी टंचाईचे संकेत दिले आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाय योजना सुरू केल्या नसल्याची माहिती आहे.
सहा महिन्यांपासून सुट्या सामानांचा अभाव
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दरवर्षी पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात वेगळे चित्र आहे. पाणी टंचाईवर उपाय योजना म्हणून विंधन विहिरींचे पाईप व सुटे सामान मागील ६ महिन्यांपासून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. पाईप आणि सुट्या सामानांची खरेदी ज्या फंडातून केली जाते. त्या देखभाल दुरूस्ती फडांत सध्या निधीच उपलब्ध नसल्याचे सांगत या विभागाच्या अधिकाºयांनी हातवर केले आहेत.
सिंचन प्रकल्पात केवळ १३ टक्के साठा
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत केवळ ५० टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील उन्हाळी धानपिक सुध्दा धोक्यात आले आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील लहान, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पात केवळ १३ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे त्याचा भूजल पातळीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
भूजल पातळी दोन मीटरने खालावली
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील १६४ निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी मोजली. त्यात भूजल पातळी दोन मीटरने खालावली असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात मागील पाच वर्षांत प्रथमच भूजल पातळी दोन मीटरने खालावल्याचे अधिकाºयांनी सांगितले.