देखभाल दुरुस्तीचे जि.प.ने दिले ३५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:29 AM2021-04-01T04:29:48+5:302021-04-01T04:29:48+5:30
गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे १ काेटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने न दिल्यामुळे ही योजना ...
गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे १ काेटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने न दिल्यामुळे ही योजना चालविण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पासून पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया यांना दिले होते. या पत्राची दखल घेत ३८ गावांचा पाणीपुरवठा कायम सुरू राहावा यासाठी ३५ लाख रुपये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला जि.प.ने दिले आहेत.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे काम लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला १५ जून २०१८ पासून १५ जून २०१९ पर्यंत दिले होते. मुदत संपल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूचनेनुसार या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू ठेवले; परंतु ऑक्टोबर २०१९ पासून मार्च-२०२१ अखेर झालेल्या कामाची देयके लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला मिळाले नाहीत, त्यामुळे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्याचबरोबर त्यांच्यवकडील मनुष्यबळ, ऑपरेटर, स्टाप व तांत्रिक स्टाप हे सर्व अडचणीत आहेत. त्यामुळे ही योजना चालू ठेवणे अवघड आहे. असे पत्र देत १८ महिन्यांचे १ कोटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावेत, अशी मागणी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे ३५ लाख रुपये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला दिले आहेत.
......
३८ गावांना दिलासा
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा तालुक्यातील ३८ गावांतील ५० हजार लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा ३१ मार्चपासून बंद होणार होता. नागरिक पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे ३५ लाख रुपये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला दिले असल्याने ही योजना सुरू राहणार आहे.