जि.प.चे १४५७ प्रकल्प रखडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:40 PM2017-12-05T22:40:15+5:302017-12-05T22:40:51+5:30
शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित असते.
नरेश रहिले।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित असते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील दीड हजार प्रकल्प पैशाअभावी रखडले आहेत. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार ३५८ प्रकल्प आहेत. त्यापैकी १ हजार ४५७ प्रकल्प रखडले असल्याने तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकºयांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचीत करता येत नाही. शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा करीत आहे. परंतु या रखडलेल्या या प्रकल्पांची कामे करण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र सद्या उभे आहे. १९० लघु सिंचन तलावपैकी १०४ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाºयांपैकी ९३ नादुरूस्त, १२ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलावांपैकी ३ नादुरूस्त, १४१५ साठवण बंधाºयांपैकी ६० नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ११८८ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास शासन कसा उदासिन आहे याची प्रचिती येते.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतोे.
गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ११८८ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकºयांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही. परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघुसिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, साठवण बंधारे व माजी मालगुजारी तलावात यंदा पाण्याचा ठणठणाट आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने तलावात थेंबभर पाणी नाही.
२९ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली
वर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तलावांमधून आजघडीला २९ हजार ५३२ हेक्टर शेती सिंचित होते. मामा तलावांमधून १६ हजार ३७५ हेक्टर, लपा तलावांमधून ३ हजार ७७९ हेक्टर, पाझर तालवांमधून ८९ हेक्टर, कोल्हापूरी बंधाºयांमुळे ३ हजार १५ हेक्टर, साठवण बंधाºयांमुळे ६ हजार १३१ हेक्टर, उपसा सिंचनामुळे १४३ हेक्टर शेती सिंचित होत आहे.
फक्त एक कोटीची गरज
शासनाने गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत असलेले सिंचन प्रकल्प दुरूस्त करण्याची तयारी दर्शविली तर १४५७ प्रकल्प दुरूस्तीसाठी फक्त एक कोटी ८ लाख ४७ हजार रूपये लागणार आहेत. सदर प्रकल्पाची दुरूस्ती झाल्यास १८ हजार ९९७ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल. मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास ९०२० हेक्टर, लपा तलाव दुरूस्त झाल्यास ५४८२ हेक्टर, पाझर तालवाच्या दुरूस्तीमुळे ३२ हेक्टर, कोल्हापूरी बंधाºयांमुळे ३०८० हेक्टर, साठवण बंधाºयांमुळे ५३३ हेक्टर, उपसा सिंचनामुळे ८५० हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल.