जि.प.चा अखर्चित संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:12 PM2018-03-18T21:12:59+5:302018-03-18T21:12:59+5:30

जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा संभावित खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.१६) सभागृहात सादर करण्यात आला. ५ कोटी २३ लाख रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

ZP's latest resolution | जि.प.चा अखर्चित संकल्प

जि.प.चा अखर्चित संकल्प

Next
ठळक मुद्देविविध योजनांचा निधी शिल्लक : विरोधकांनी घेतला आक्षेप

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा संभावित खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.१६) सभागृहात सादर करण्यात आला. ५ कोटी २३ लाख रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. २०१८-१९ मध्ये एकूण १५ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूली खर्च संभावित आहे. मात्र या अर्थसंकल्पावर बारकाईने नजर टाकली असता मागील अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या विविध योजनांवरील खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे जि.प.चा अखर्चित संकल्प अशी टिका विरोधकांनी केली.
जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती हमीद अल्ताफ अकबर अली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बांधकाम विभागावर सर्वाधिक ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाचे नियोजन करताना विविध बाबींकडे दुर्लक्ष केले. यात केलेल्या तरतुदींवर विरोधक तसेच सत्ताधारी काही सदस्यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. जि.प.विरोधी पक्षनेता गंगाधर परशुरामकर यांनी अर्थसंकल्पात काही विभागांवर करण्यात आलेल्या अवाजवी तरतूदींवर आक्षेत घेत त्यात कपात करुन सुधारीत अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी केली. या मागणीचे इतरही सदस्यांनी समर्थन केल्याने सभापतींनी यात सुधारणा करण्याचे मान्य केले.
अर्थसंकल्पात महिला बाल कल्याण विभागाच्या अभ्यास दौऱ्याकरीता ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात कपात करून त्यातील निधी वळता करण्याची मागणी सदस्यांनी केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशिन तसेच सौर कंदील वाटप निधीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार या निधीत वाढ करीत एकूण ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मागील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ताडपत्री वाटपासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र यापैकी एकही निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांवर संताप व्यक्त केला.अर्थसंकल्पात बºयाच योजनांवर अवाजवी तरतूद करण्यात आली होती. त्यात कपात करुन तो निधी कृषी विषयक व पाणी पुरवठा सारख्या योजनांवर वळता करण्याची मागणी परशुरामकर यांच्यासह कुंदन कटारे, मनोज डोंगरे, दुर्गा तिराले, राजलक्ष्मी तुरकर यांनी लावून धरली. ती मान्य करीत हा निधी सदस्यांनी सुचविलेल्या योजनांसाठी वळता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
क्रीडा महोत्सवाचा निधी केला वळता
जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवासाठी ७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी देण्याची गरज नसल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हा निधी सुद्धा वळता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषीविषयक योजनांवरील तरतुदीत वाढ
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठा योजना आणि विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीत वाढ केली आहे.
जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना जुडो कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्हा परिषदेच्या एक हजार ६९ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
पदाधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता नको
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती यांच्या घरभाडे भत्त्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करुन येथे पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने तयार करण्यात आली आहे. त्यात पदाधिकाऱ्यांनी जावून राहावे. त्यामुळे त्यांना घरभाड्यासाठी निधी देण्याची गरज नाही, असा मुद्दा विरोधकांनी लावून धरला. त्यानंतर हा निधी वळता करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पदाधिकाऱ्यांच्या वाहन दुरूस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र नवीन वाहन खरेदी करण्यात येणार असल्याने घसारा निधीची गरज नसल्याची बाब विरोधकांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे हा निधी देखील वळता करण्यात आला.

Web Title: ZP's latest resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.