‘झेडपी’ झाली व्हॅकन्ट
By Admin | Published: April 21, 2015 12:37 AM2015-04-21T00:37:25+5:302015-04-21T00:37:25+5:30
‘झेड.पी.’, अर्थात जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यासाठी एक मिनी मंत्रालयच, मात्र गोंदिया जिल्हा परिषदेत सध्या अधिकाऱ्यांची इतकी वाणवा आहे
७३ अधिकारी नाहीत : कारभारावर होतोय गंभीर परिणाम
गोंदिया : ‘झेड.पी.’, अर्थात जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यासाठी एक मिनी मंत्रालयच, मात्र गोंदिया जिल्हा परिषदेत सध्या अधिकाऱ्यांची इतकी वाणवा आहे की झेडपी म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ म्हणण्याची वेळ आली आहे. वर्ग एक आणि दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ७३ जागा रिक्त आहेत. याचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत विविध १४ विभागांचा कारभार चालतो. यातील अर्धेअधिक विभागप्रमुखही सध्या प्रभारी आहेत. बचत गटांसह केंद्र सरकारच्या योजनांची थेट अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांसह सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत आणि बालकल्याण ही पदे रिक्त आहेत. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नियोजन महत्वाचे असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कारभार सांभाळणारे कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अभियंता नाही. यांत्रिकी विभागात उपअभियंताही निवृत्तीनंतर दुसरे मिळाले नाही. बांधकाम विभाग आणि लघु पाटबंधारे विभागात उपकार्यकारी अभियंत्याची दोन पदे रिक्त आहेत. सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. गटविकास अधिकाऱ्यांची २ पदे रिक्त आहेत.
वरील वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्यांसह वर्ग २ चे अनेक अधिकारी नाहीत. त्यात शालेय पोषण आहार अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची प्रत्येकी ६ पदे भरलेली नाहीत.