झेडपीत राहणार जुनाच पॅटर्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:01 PM2018-01-14T21:01:59+5:302018-01-14T21:02:36+5:30

ZWP remains in old pattern | झेडपीत राहणार जुनाच पॅटर्न कायम

झेडपीत राहणार जुनाच पॅटर्न कायम

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणूक : सर्वांची वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात काँग्रेस व भाजप कट्टर विरोधक असले तरी गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र नेमके याविरुद्ध चित्र आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरसे संख्याबळ असले तरी अडीच वर्षांपूर्वी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपाशी अभद्र युती करुन सत्ता स्थापन केली होती. हेच समीकरण सोमवारी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुुळे झेडपीत जुनाच पॅटर्न कायम राहण्याची चर्चा आहे.
विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १५ जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी सोमवारी (दि.१५) निवडणूक होत आहे. सध्या जि. प. मध्ये काँग्रेस-भाजपा युतीची सत्ता आहे. एकूण ५३ सदस्य असलेल्या येथील जि.प.तील पक्षीय बलाबल बघता काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपाचे १७ सदस्य आहे. सदस्यांची संख्या पाहता राष्ट्रवादीकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. तर जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या बहुमताच्या आकड्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीत आल्यास हा आकडा सहज पार करणे शक्य आहे. मात्र सध्याचे जिल्ह्यातील राजकारण पाहता आणि पंचायत समिती निवडणुकी दरम्यान झालेल्या पत्रकबाजीवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.
सोमवारी होणाºया जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला घेवून या दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांमध्ये रविवारी रात्री उशीरापर्यंत कुठल्याच वाटाघाटी झाल्या नाहीत. भाजपा नेते देखील समीकरण काय असेल किंवा नेमकी भूमिका काय असणार यावर काहीच बोलायला तयार नाहीत. तर काँग्रेसचे स्थानिक नेते आ.गोपालदास अग्रवाल जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगत आहेत. राष्ट्रवादीचे नेते सुध्दा या निवडणुकीवरुन काँग्रेसच्या नेत्यांसोबत अद्याप कुठल्याच वाटाघाटी झाल्या नसल्याचे सांगत आहेत. विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जि. प. निवडणुकीचा निर्णय स्थानिकांवर सोपविल्याची माहिती आहे.
एकंदरीत या सर्व घडामोडी पाहता आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने जि.प.मध्ये काँग्रेस-भाजपा अभद्र युतीचा जुनाच पॅटर्न कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी काही वाटाघाटी झाल्यास या समिकरणात बदल होवू शकतो.
जादू चालणार का?
माजी खा. नाना पटोले यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्हा परिषदेतील सध्याच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. जि.प.मध्ये काँग्रेस-भाजप या अभद्र युतीला ते कधीच मान्य करणार नाहीत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या निवडणुकी दरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ऐनवेळी पटोले यांची जादू चालणार का? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मडावी की कुमरे वेळेवर ठरणार
जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. यासाठी काँग्रेसकडून फुलचूर जि.प.क्षेत्राच्या सीमा मडावी व देवरी जि.प.क्षेत्राच्या माधुरी कुमरे या या दोघींची नावे चर्चेत आहेत. मात्र काँग्रेसने अध्यक्षपदी या दोघांपैकी नेमके कोण विराजमान होणार हे उघड केलेले नाही. नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या दहा मिनिटापूर्वी नाव निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: ZWP remains in old pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.