बापरे! 12 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक; कमी वयात अटॅक येण्यामागची जाणून घ्या कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 11:39 AM2023-09-19T11:39:45+5:302023-09-19T11:45:49+5:30
राजकोटमध्ये 12 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे.
हार्ट अटॅक ही एक जीवघेणी स्थिती आहे जी सहसा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक येऊ शकतो. राजकोटमध्ये 12 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच 20 वर्षांच्या दोन तरुणांना हार्ट अटॅक आला. गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
द्वारकाच्या विजापूर गावात एका 12 वर्षाच्या मुलाचा त्याच्याच घरात मृत्यू झाला. सहावीत शिकणारा हा मुलगा पहाटे साडे पाच वाजता घराच्या दारात बेशुद्धावस्थेत सापडला. मुलाच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलाने कोरोनाची लस घेतलेली नाही. लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण फारच दुर्मिळ असलं तरी पालकांनी त्याबाबत सावध राहावं.
मुलांच्या छातीत दुखण्याची कारणं
Healthychildren.org च्या मते, मस्क्यूकोस्केलेटल चेस्ट पेनमुळे अनेक मुलांना छातीत दुखतं. या वेदनाचा उगम छातीच्या स्नायू आणि हाडे आणि त्यांच्या जोडणीतून होतो. जेव्हा छातीचे स्नायू आणि नसा दुखतात तेव्हा छातीत दुखू शकते. ही वेदना सतत येत राहते. याशिवाय खोकल्यादरम्यान छातीत दुखण्याची तक्रारही होऊ शकते.
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
शारीरिक श्रम, व्यायाम किंवा कोणतीही थकवा आणणारी क्रिया करताना मुलाला छातीत दुखत असेल, छातीतील वेदना आणि दाब कमी होत नसेल, अनेक दिवस, आठवडे व्यायाम करण्याची क्षमता कमी होत असेल आणि छातीत दुखत असेल, जन्मजात हृदयविकाराने जन्मलेल्या मुलांमध्ये छातीत दुखणे, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या मुलांमध्येही अनुवांशिक कारणांमुळे छातीत दुखू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
मुलांना हार्ट अटॅक येऊ शकतो का?
लहान मुलांना हार्ट अटॅक येणं सामान्य गोष्ट नाही, परंतु जर त्यांची कोरोनरी आर्टरी असामान्य असेल किंवा हृदयाच्या स्नायूशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असू शकतो. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी ही हृदयाच्या स्नायूची एक असामान्यता आहे ज्यामुळे ते खूप जाड होते. हे 200 पैकी एकामध्ये असतं. याचा पुढे त्रास होऊ शकतो.
डॉक्टरकडे कधी जायचं?
जर मुलाला अन्नासंबंधी समस्या येत असेल, थकवा जाणवत असेल, भूक न लागणे, चिडचिड होणे, जुलाब, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, उलट्या होणे असा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.