मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; दूषित पाण्यामुळे होतो संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:14 AM2024-07-05T07:14:12+5:302024-07-05T07:15:00+5:30
२०२३ आणि २०१७ मध्ये राज्याच्या किनारी अलपुझा जिल्ह्यात हा संसर्ग आढळून आला होता.
कोझिकोडे : केरळमधील कोझिकोडेमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होणाऱ्या संसर्गामुळे (अमीबिक मेनिंगोॲन्सेफलायटीस) एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अहवालानुसार, मृदुल नावाचा हा मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला होता, त्यामुळे त्याला हा संसर्ग झाला.
केरळच्या आरोग्य विभागाने गुरुवारी सांगितले की, बुधवारी रात्री ११:२० वाजता मृदुलचा मृत्यू झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हा संसर्ग दूषित पाण्यात आढळणाऱ्या प्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो. तो नाकाच्या पातळ त्वचेतून शरीरात प्रवेश करतो. मे २०२४ पासून केरळमध्ये संसर्गाची ही तिसरी घटना आहे. २१ मे रोजी मलप्पुरममधील पाच वर्षांच्या मुलीचा यामुळे पहिला मृत्यू झाला होता. २५ मे रोजी कन्नूर येथील १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. २०२३ आणि २०१७ मध्ये राज्याच्या किनारी अलपुझा जिल्ह्यात हा संसर्ग आढळून आला होता.
काय आहेत लक्षणे?
केरळमध्ये २०१६ मध्ये याचे पहिले प्रकरण आढळून आले. यानंतर २०१९, २०२०, २०२२ मध्ये प्रत्येकी एक संसर्ग आढळून आला होता. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.