मॉर्निंग वॉकला गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:16 PM2023-02-17T16:16:17+5:302023-02-17T16:17:48+5:30
२६ वर्षीय तरुणाला मॉर्निंग वॉकला निघाल्यावर हृदयविकाराचा झटका आला.
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रोहित केशरी या २६ वर्षीय तरुणाला मॉर्निंग वॉकला निघाल्यावर हृदयविकाराचा झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. रोहितने जगाचा निरोप घेईल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. रडून रडून नातेवाइकांची अवस्था वाईट झाली आहे. रुग्णालयातून मृतदेह घरी पोहोचताच परिसरात शोककळा पसरली.
जलपा देवी रोड, गोला दीनानाथ येथील संतोष केशरी उर्फ कल्लू यांचा मुलगा रोहित केशरी हा सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी मैदागीन येथील कंपनी गार्डनमध्ये गेला होता. वेळेवर घरी पोहोचताच त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. नातेवाईकांनी त्याला जवळच्या दवाखान्यात नेले आणि नंतर विभागीय रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरांनी तपासाअंती रोहितला मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. रोहितच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. रोहितला ओळखणाऱ्यांना ही बातमी ऐकून धक्काच बसला. केवळ २६ वर्षांचा रोहित आता त्यांच्यासोबत नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. रुग्णालयातून मृतदेह घरी पोहोचल्यावर कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे परिसरात शोककळा पसरली. तीन भावांमध्ये मोठा असलेला रोहित जनरल स्टोअरच्या दुकानात सामान पुरवायचा.
छातीत दुखणं, अस्वस्थता, घाम येणं ही धोक्याचे संकेत
उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीसाठी मॉर्निंग वॉक महत्त्वाचा आहे. पण फिरायला जाण्यापूर्वी तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी छातीत दुखत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास, घाम येत असल्यास काळजी घ्या. ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा उच्च रक्तदाब असेल तर चालणे किंवा जॉगिंग करणे धोकादायक ठरू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.