२६० किलो वजनाच्या सिंहाला कॅन्सर, माणसांच्या रूग्णालयात करण्यात आले उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:06 AM2019-05-13T10:06:26+5:302019-05-13T10:13:04+5:30
सिंहावर सहा तज्ज्ञांच्या टीमने उपचार केले. यात पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेत एका सिंहावर कॅन्सरचा उपचार करण्यात आला. या सिंहाला मनुष्यांना देतात तशीच रेडीएशन थेरपी दिली गेली आणि हे सगळं एका खाजगी रूग्णालयात करण्यात आले. सामान्य रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरू नये म्हणूण सिंहाला ऑपरेशन थिएटरमध्ये मागच्या दाराने आणण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमने पाच मिनिटे ही थेरपी केली. १६ वर्षाच्या या सिंहाचं वजन २६० किलो ग्रॅम आहे.
उत्तर-पूर्व दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया येथील मुएलमेड मेडिक्लिनीकमध्ये जेव्हा त्याला आणलं गेलं, तेव्हा त्याच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली होती. जनावरांसाठी दक्षिण आफ्रिकेत एकही रेडिएन क्लीनिक नाहीये. त्यामुळे त्याला बेशुद्ध करून खाजगी रूग्णालयात आणलं गेलं.
डॉक्टरांनी सांगितले की, सिंहावर सहा तज्ज्ञांच्या टीमने उपचार केले. यात पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा समावेश होता. सिंहाच्या नाकावरील जखमांवर उपचार करण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांवर आणि नाकाच्या भागाला बॅंडेज बांधण्यात आले. जेणेकरून पाच मिनिटे चालणाऱ्या उपचारावेळी सुरक्षा असावी. या सिंहाचा केअरटेकर असलेल्या हायनिसने सांगितले की, रेडिओथेरपीचे पाच सेशन होतील. तशी ही थेरपी फार महागडी आहे. पण याचा फायदा नक्की होईल.
हा सिंह प्रेटोरियापासून १८ किमी दूर लॉरी पार्क अॅनिमल अॅन्ड ओल सॅन्चुरीमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जखमा बघण्यात आल्या आणि नंतर बायोप्सी केली गेली. त्यातून त्याला कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं. हायनिसने सांगितले की, हा सिंह आमच्या अपत्यासारखा आहे. त्याला वाचवण्यासाठी आम्ही वाट्टेल ते प्रयत्न करणार आहोत. सामान्यपणे एका वाघाचं जंगलातील सरासरी आयुष्य हे १४ वर्ष तर पिंजऱ्यात साधारण २२ वर्षाचं असतं.