२०१७ मध्ये जगभरात टीबीचे १ कोटी रुग्ण, भारतात २७ लाख लोकांना टीबी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:03 AM2018-09-20T10:03:13+5:302018-09-20T10:04:16+5:30
टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो.
नवी दिल्ली : टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. हा किटाणु हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतो. जर या आजारावर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर हा आजार जीवघेणा ठरु शकतो. टीबी जनरली फुफ्फुसांना निकामी करतो पण हा आजार शरीराच्या कोणत्याही अंगाला प्रभावित करु शकतो.
डब्ल्यूएचओच्या ग्लोबल ट्यूबरक्लोसिस रिपोर्ट २०१८ या जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, जगभरात गेल्या वर्षात एक कोटी लोक टीबीने ग्रस्त झाले. ज्यात २७ टक्के लोक भारतातील आहेत. या रिपोर्टमध्ये टीबीबाबत अधिक व्यापक आणि नवीन निरीक्षणे दिली आहेत. सोबतच वैश्विक, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर या आजाराबाबत काय पावले उचलली जात आहेत, त्यात काय विकास झालाय ही माहिती देण्यात आली आहे.
भारतानंतर चीनमध्ये सर्वाधिक टीबी रुग्न
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये जगभरात १ कोटी लोकांना टीबी झाला. त्यात ५८ लाख पुरुष, ३२ लाख महिला आणि दहा लाख लहान मुले आहेत. एकूण रुग्णांपैकी २७ टक्के रुग्ण भारतात आहेत. चीनमध्ये ९ टक्के, इंडोनेशियामध्ये ८ टक्के, फिलीपीनमध्ये ६ टक्के, पाकिस्तानमध्ये ५ टक्के, नायजेरियामध्ये ४ टक्के, बांगलादेशमध्ये ४ टक्के आणि दक्षिण आफ्रिकेत ३ टक्के लोकांना टीबी झाला.
टीबी जगभरात रोज किती लोक मरतात?
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, टीबीमुळे रोज जगभरात साधारण ४ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. यात हेही सांगण्यात आलं आहे की, जगात आजाराने मृत्यूमुखी पडण्याचं १० वं सर्वात मोठं कारण टीबी आहे.
टीबीचे लक्षणे
टीबीचा उल्लेख झाला की, कमजोरी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे लोकांच्या डोक्यात येतात. असे समजले जाते की, रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं आहे. पण टीबी केवळ फुफ्फुसाचा आजार नाहीये. तर टीबीचं इन्फेक्शन शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
१) श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे
२) खोकला आला की उलटी होणे
३) तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त सतत खोकला असणे
४) ताप येणे
५) शरीरात कमजोरी, वजन कमी होणे, थकवा येणे
६) कफ होणे
७) थंडी वाजून ताप येणे
८) रात्री घाम येणे
टीबी होण्याची प्रमुख कारणे
डॉक्टरांनुसार, या आजाराचं मुख्य कारण अशुद्ध पाणी आणि व्यायाम न करणे हे आहे. चांगला आहार आणि नियमीतपणे व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच तुमच्या शरीराची बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमताही वाढते. त्यासोबतच टीबी होण्याची कारणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
१) धुम्रपान
२) अल्कोहोल
३) चांगला आहार न घेणे
४) व्यायाम न करणे
५) स्वच्छतेचा अभाव
६) टीबीने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे