फुप्फुस कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण ३० टक्के; महिलांमध्ये २० टक्के प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:35 AM2021-05-31T08:35:52+5:302021-05-31T08:36:18+5:30
धूम्रपानाला दूर ठेवण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
नागपूर : फुप्फुसांचा कर्करोग हा पहिल्या पाच जीवघेण्या आजारांपैकी एक आहे. दिल्ली, चेन्नई, बंगळुरूनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. जगात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण २० टक्के आहे. भारतात फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ९.८१ टक्के आहे. वेळीच उपचार घेतल्यास कॅन्सरचा रुग्ण बरा होऊ शकतो. तंबाखूच्या दुष्परिणामांच्या माहितीविषयी जनजागृती करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
जगभरात फुप्फुसांच्या कर्करोगाच्या घटना वाढू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये या रोगाचे प्रमाण १४.४ टक्के आहे. भारतात दरवर्षी या रोगाचे सुमारे ६३ हजार नवीन रुग्ण आढळून येतात. नवीन ग्लाबोकॅन अहवालानुसार स्तन, गर्भाशय व मुख कर्करोगानंतर फुप्फुसांचा कर्करोग हा चौथ्या स्थानी आहे. फुप्फुसांचा कर्करोग असलेल्या भारतीय रुग्णांमध्ये तंबाखू हे मुख्य कारण ठरले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, धूम्रपान आणि फुप्फुसांचा कर्करोग यांचा जवळचा संबंध आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा आजार ८७ टक्के, तर अप्रत्यक्षरीत्या करणाऱ्यांमध्ये तीन टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा निदान होणे होय. याशिवाय चुकीचे निदान करून क्षयरोग झाल्याचे दाखविले जाते.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरू असलेला खोकला, खोकताना रक्त येणे, सतत छातीत दुखणे, श्वास घेताना किंवा खोकताना त्रास होणे किंवा वेदना होणे, थकवा वाटणे, भूक न लागणे किंवा अनपेक्षितपणे वजन कमी होणे, धाप लागणे किंवा श्वास घेताना दम लागणे आणि आवाज घोगरा होणे, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. - डॉ. सुशील मानधनिया, कर्करोगतज्ज्ञ
धूम्रपानामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होतात
तंबाखूचे व्यसन वाढतच चालले आहे. असेच राहिल्यास २०३० पर्यंत १० पैकी एक रुग्ण तंबाखूमुळे आजारी पडेल. धूम्रपानाच्या व्यसनामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होतात. भारतात दरवर्षी जवळपास १२ लाख कर्करोग रुग्णांची नोंदणी होते. यात सुमारे पाच लाख पुरुष व तीन लाख महिलांचा विविध कर्करोगाने मृत्यू होतो. - डॉ. करतार सिंग, संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल.