आठवड्यातून चार दिवस काम, कंपनी खूश आणि स्टाफही खूश - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:03 AM2019-03-06T11:03:56+5:302019-03-06T11:07:10+5:30
न्यूझीलॅंडची कंपनी Perpetual Guardian ने ५ मार्च २०१८ ला एक अनोखा प्रयोग केला होता.
(Image Credit : blog.nextbee.com)
न्यूझीलॅंडची कंपनी Perpetual Guardian ने ५ मार्च २०१८ ला एक अनोखा प्रयोग केला होता. यात त्यांनी २४० कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात केवळ ४ दिवस काम करण्यास सांगितले. यानंतर कंपनीने ८ आठवडे चाललेल्या या प्रयोगाचा सकारात्मक प्रभाव कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर, प्रेरणा आणि त्यांच्या आउटपुटवर दिसला.
यादरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार, सुट्टी आणि इतरही सुविधा तशाच होत्या, पण ते त्यावेळी आठवड्यातून पाच दिवस किंवा ३७.५ तासऐवजी चार दिवस ३० तास काम करत होते. यातून आश्चर्यजनक निष्कर्ष समोर आलेत. कर्मचाऱ्यांच्या तणावात १६ टक्के कमतरता आढळली. तसेच त्यांच्या वर्क-लाइफ बॅलन्समध्ये ४४ टक्के सुधारणा झाली. त्यासोबतच कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता, नवीन विचार, सशक्तीकरण आणि नेतृत्व यातही सुधारणा बघायला मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रयोगामुळे कंपनीच्या उत्पादकतेमध्ये कोणत्याही प्रकारची घट बघायला मिळाली नाही.
Perpetual Guardian कंपनीमध्ये ब्रॅन्च मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या टॅमी बार्कर म्हणाल्या की, 'जेव्हा मी पहिल्यांदा एका आठवड्यात चार दिवस काम करण्याबाबत ऐकलं तेव्हा मला काही शंका आल्या. मला याबाबत जाणून घ्यायचं होतं. पण नंतर जेव्हा प्रस्ताव ठेवला गेला तेव्हा मला याची जाणीव झाली की, यात काहीही गडबड नाही. मला तर असं वाटलं की, जसा उत्सवाचं वातावरण आहे'.
टॅमी यांनी सांगितले की, त्यानंतर कामाबाबत त्यांचा दृष्टीकोन एकाएकी फार बदलला. यादरम्यान त्यांनी एकावेळी एकाच कामावर फोकस केलं. त्यानंतर दुसरी कामे वाढली. याआधी त्या एकावेळी एकापेक्षा अधिक कामे करत होत्या.
कामावर फोकस वाढला
टॅमी यांनी सांगितले की, 'आम्हाला एक ऑफ निवडायला सांगितला. मी बुधवार निवडला. याचा अर्थ हा आहे की, आठवड्याच्या सुरूवातील माझ्याकडे कामावर फोकस करण्यासाठी दोन दिवस असतील नंतर एक दिवस ऑफ असेल. हे फारच भन्नाट होतं'.
या प्रयोगाच्या शेवटी निष्कर्ष स्पष्ट झाले. त्यानंतर या कंपनीने चार दिवस कामाचा हा प्रयोग १ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरू ठेवला. तशी कर्मचाऱ्यांना सुटही होती की, त्यांना हवं असेल तर ते चार दिवस काम करण्याऐवजी पाच दिवस जुन्या पद्धतीने काम करू शकतात.
कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टीन ब्रदरटन यांनी सांगितले की, 'जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत आणि त्यांच्या बॉसबाबत विश्वासाची जाणीव होत असेल तर ते जास्त उत्पादक होतील. या प्रयोगाच्या माध्यमातून आम्ही हे बघितलं की, जर स्टाफ एकाग्र आणि प्रेरित असेल तर त्यांच्या क्षमताही वाढतात'.
आपल्या या प्रयोगाच्या विश्लेषणासाठी कंपनीने न्यूझीलॅंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ऑकलॅंड आणि ऑकलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीची मदत घेतली. या प्रयोगाच्या सुरूवातीनंतर कंपनीसोबत २८ देशांतून ३५० पेक्षा जास्त कंपन्यांनी या प्रयोगाबाबत माहिती शेअर करण्याची विनंती केली.