मुंबई पालिकेच्या पाच रुग्णालयांत ४३९ डॉक्टरांच्या जागा रिकाम्या
By संतोष आंधळे | Published: August 22, 2023 10:38 AM2023-08-22T10:38:52+5:302023-08-22T10:39:12+5:30
३२३ डॉक्टरांना नेमले कंत्राटावर, रिक्त जागा भरण्याला मुहूर्त मिळेना
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या नायर, नायर डेंटल, केईएम, सायन व कूपर रुग्णालयातील अध्यापकांच्या एकूण १६०६ पदांपेकी ४३९ पदे (२७ टक्के) रिकामी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या एकूण जागांतील ३२३ पदांवर (२० टक्के) असणारे डॉक्टर्स हे कंत्राटी पद्धतीने भरले गेले असून ते अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला डॉक्टरांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी केव्हा मुहूर्त मिळणार, असा संतप्त सवाल डॉक्टरांकडून विचारला जात आहे.
मुंबई वा राज्यातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमधूनही हजारो रुग्ण मुंबईतील या रुग्णालयांमध्ये येत असतात. नियमितपणे ही पाचही रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरून वाहत असतात. अनेक शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी या रुग्णालयांमध्ये आहे. सीटी आणि एमआरआयच्या चाचण्यांसाठी महिनाभर वेळ मिळत नाही, अशी स्थिती असताना डॉक्टर भरतीबद्दल कंत्राटी विचारसरणी काय कामाची, असाही सवाल केला जात आहे.
ज्यावेळी डॉक्टरांची भरती निघेल त्यावेळी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ असे सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय खुला वर्गासाठी ३८ तर आरक्षित वर्गासाठी ४३ आहे. अनेक डॉक्टरांचे वय आता निघून जाण्याच्या मार्गावर आहे. सरासरी पाच ते सात वर्षांपासून डॉक्टर कंत्राटी पदावर काम करत आहेत. इतकेच नव्हे तर काही डॉक्टर कंटाळून सोडून गेले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात डॉक्टर भरतीचे पहिले पद म्हणजे सहाय्यक प्राध्यापक असे असून या प्राध्यापकावर रुग्ण तपासण्याची प्राथमिक जबाबदारी असते. महापालिकेत गेली अनेक वर्षे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती झालेली नाही. गेली अनेक वर्षे या पदावर कंत्राटी तत्वावर डॉक्टरांची भरती केलेली आहे.
या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
- सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय निघून गेल्यावर काय करणार ?
- ५ ते ७ वर्ष काम केलेल्या कंत्राटी डॉक्टरांना मिळणारे वेतन आणि नुकतेच पदव्युत्तर पदवी पास केलेल्या बॉन्डेड डॉक्टरांचे वेतनसारखेच कसे ?
- डॉक्टरांच्या मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत मग जाहिरात का काढत नाही ?
- गेली पाच वर्ष पदभरती का गेली नाही ?
- नियमित डॉक्टरांप्रमाणे कंत्राटी डॉक्टरांना रजा का नाही?
बिंदुनामावली बनविण्याचे काम सुरू आहे. सर्व पदांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर लवकरच रिकाम्या पदाची जाहिरात काढून एमपीएससीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत. फाईल मंत्रालयीन स्तरावर आहे. सहायक प्राध्यापकाची पदे भरण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे.
- डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त