जगभरातील ५२ टक्के लोक डोकेदुखीमुळे बेजार, शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:12 AM2022-10-28T11:12:29+5:302022-10-28T11:12:53+5:30
डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मायग्रेन, सामान्य स्वरूपाची डोकेदुखी, तणावामुळे होणारी डोकेदुखी आदी गोष्टींचा समावेश आहे.
ओस्लो : जगातील सुमारे ५२ टक्के लोकांना दरवर्षी डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून काढला आहे. त्यातील काही लोकांमध्ये डोकेदुखीचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मायग्रेन, सामान्य स्वरूपाची डोकेदुखी, तणावामुळे होणारी डोकेदुखी आदी गोष्टींचा समावेश आहे. १९६१ ते २०२० सालापर्यंतच्या कालावधीत डोकेदुखीसंदर्भात जे संशोधन झाले, त्याचा अभ्यास नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी केला. तसेच हा आजार असलेल्या अनेक रुग्णांच्या आजाराबाबतच्या माहितीचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. (वृत्तसंस्था)
२६% लोकांनातणावामुळे डोकेदुखी
नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जगात डोकेदुखीने हैराण झालेल्या रुग्णांपैकी १४ टक्के लोकांना मायग्रेन तर २६ टक्के लोकांना तणावामुळे डोकेदुखीला सामोरे जावे लागते. या लोकांपैकी काही जणांचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. दरदिवशी जगातील लोकसंख्येपैकी १५.८ टक्के लोक डोकेदुखीने बेजार असतात.
- मायग्रेनच्या रुग्णांमध्ये १७% महिला, ८.५% पुरुष
- ६ टक्के महिलांमध्ये डोकेदुखीचा आजार पंधरा किंवा त्याहून अधिक दिवस कायम राहतो. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण २.९ टक्के आहे.
- २०१९ साली डोकेदुखीच्या आजारासंदर्भात एक पाहणी करण्यात आली होती. त्यात म्हटले होते की, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक आहे.
स्मार्टफोन, संगणक डोकेदुखीचे कारण
- मायग्रेनची समस्या वाढण्याची अनेक कारणे आहेत. संशोधकांनी सांगितले की, मानसिक, शारीरिक कारणांबरोबरच पर्यावरणातील बदलांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
- आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसित २. झालेल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा अनेक उपकरणांचा दैनंदिन वापर वाढला आहे. त्यामुळेही मायग्रेनच्या समस्येला सामोरे जावे लागते.