तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक आहेत 'या' सवयी, दृष्टी कमजोर होण्याआधी वेळीच बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:29 AM2022-07-13T11:29:12+5:302022-07-13T11:53:20+5:30

फिटनेससाठी आपण योग्य आहार आणि व्यायामावरभर देतो; पण त्यासोबत आपण डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांकडे पुरेसं लक्ष देतोच असं नाही.

7 habits which are harmful for your eyes | तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक आहेत 'या' सवयी, दृष्टी कमजोर होण्याआधी वेळीच बदला

तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक आहेत 'या' सवयी, दृष्टी कमजोर होण्याआधी वेळीच बदला

googlenewsNext

जीवनशैली, (Lifestyle) तसंच वर्किंग कल्चरमध्ये (Working Culture) बदल झाल्याने आरोग्यविषयक (Health) समस्या वाढत आहेत. अनेकांना कमी वयातच हृदयविकार, डायबेटीससारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच फिटनेसकडे (Fitness) कल वाढला आहे. फिटनेससाठी आपण योग्य आहार आणि व्यायामावरभर देतो; पण त्यासोबत आपण डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांकडे पुरेसं लक्ष देतोच असं नाही.

मोबाइल, लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या अति वापरामुळे डोळ्यांच्या (Eye) आरोग्यावर परिणाम होतो. त्यासोबत आनुवंशिकता, वय आणि अन्य आजारही डोळ्यांवर परिणाम करतात. त्यामुळे दृष्टीदोष (Vision Defect) निर्माण होतो. डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आणि स्क्रीनचा अति वापर टाळणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितावह ठरतं. `एनडीटीव्ही`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दृष्टी चांगली राहावी, यासाठी कष्ट घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. चुकीच्या काही सवयींमुळे (Bad Habits) डोळ्यांचं आरोग्य बिघडतं आणि दृष्टी कमकुवत होते. त्यामुळे अशा सवयी सोडण्यावर भर देणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात जागरण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुरेसा आराम न घेतल्यानं डोळं लाल होणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं आणि डोळे कोरडे पडणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे रात्री सहा ते आठ तास पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांसोबतच तुमचं सर्वांगीण आरोग्य सुधारतं.

स्मार्टफोनवर बारीक अक्षरांतला मजकूर वाचण्याचा सतत प्रयत्न केल्यानं डोळ्यांवर ताण येतो आणि यामुळे दृष्टीसंबंधी समस्या निर्माण होतात. तुम्ही रोज दीर्घ काळ काम करत असाल तरीदेखील ही समस्या निर्माण होते. स्मार्टफोन (Smartphone) प्रमाणापेक्षा अधिक वेळ पाहिल्यानं डोळे कोरडे पडणं, चक्कर येणं, दृष्टी अंधूक होणं आणि मळमळ होणं असे त्रास होतात. त्यामुळे दर 20 मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती देणं गरजेचं आहे.

नियमितपणे बाहेर जाताना सन ग्लासेसचा (Sun Glasses) वापर करत नसाल तर तुमचे डोळे हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात येतात. या किरणांमुळे अकाली प्रौढत्व आणि डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. या किरणांमुळे डोळ्यांच्या पुढच्या भागाला सनबर्न, मॅक्युलर डीजनरेशन आणि अगदी कॅन्सरही होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना अतिनील किरणांपासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी सनग्लासेस अवश्य घाला.

धूम्रपानाची (Smoking) सवय धोकादायक ठरू शकते. धूम्रपानामुळे फुफ्फुस, घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसंच डोळ्यांच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. सिगारेट आणि तंबाखूच्या इतर प्रकारांमुळे मॅक्युलर डीजनेरेशन, मोतिबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी आणि अन्य धोकादायक आजार होतात. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना अंधत्व येण्याची शक्यता चारपट जास्त असते.

वारंवार डोळे चोळण्याच्या सवयीमुळे दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. वारंवार डोळे चोळल्यामुळे पापण्यांखालच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेशन फायदेशीर ठरू शकतं.

अश्रू तयार होण्यासाठी आणि डोळे चमकदार राहण्यासाठी हायड्रेशन (Hydration) आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यानं डिहायड्रेशन होतं. यामुळे अश्रू निर्माण होण्यात अडचणी येतात. तसंच यामुळेडोळे कोरडे पडणं, सूज येणं आणि लाल होणं या समस्या उद्भवतात. त्यामुळे रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

गाजर खाल्ल्यानं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, हे तुम्ही ऐकलं असेल; पण असे अनेक पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात (Diet) फळं आणि भाजीपाल्याचा समावेश गरजेचा आहे. फळं, भाज्यांमध्ये झिंक, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक असतं. पिवळ्या आणि नारिंगी रंगाची फळं आणि भाज्या, हिरव्या भाज्या, अंडी, दाणे आणि सी-फूड खाल्ल्यानं डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. डोळ्याच्या आरोग्यासाठी योग्य आहाराची सवय फायदेशीर ठरते.

Web Title: 7 habits which are harmful for your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.