दही-भात खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:15 AM2018-07-20T11:15:30+5:302018-07-20T11:15:42+5:30
वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर दही आणि भात खावा. याने वजन वाढत नाही तर कमी होतं. चला जाणून घेऊ दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
दही खाल्याने आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण कधी तुम्ही दही भात खाल्लाय? काय तुम्हाला दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत? अनेकांना असं वाटतं की, भात खाल्याने वजन वाढतं. त्यामुळे इच्छा असूनही अनेकजण भात खात नाहीत. पण वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर दही आणि भात खावा. याने वजन वाढत नाही तर कमी होतं. चला जाणून घेऊ दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
वजन कमी होण्यास मदत
दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होते. याने एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. कारण यात कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्त होऊन खाऊ शकता.
शरीराचं तापमान होतं कमी
दक्षिण भारतात दही-भात जास्तप्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? याचं कारण म्हणजे तिथे वर्षभर गरम वातावरण असतं. दही-भात शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करतो. तुम्ही दही-भात कोणत्याही गरम जेवणानंतर खाऊन बघा तुम्हाला थंड वाटेल.
प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात
दह्याध्ये कॅल्शिअमसोबतच प्रोटीनचं प्रमाणही अधिक असतं. दही हे एक चांगल अॅंटीऑक्सीडेंटही आहे. त्यामुळे दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
पोटदुखीवर उपाय
भातात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे पोटाचं दुखणं दूर होतं. दही आणि भात खाल्याने मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो.
पचनक्रिया होते चांगली
दक्षिण भारतातील लोक दही-भात जेवणाच्या शेवटी खातात. कारण याने जेवण पचायला मदत होते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्याने तुम्हाला जेवण पचायला सोपं जातं.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे जितका जास्त दही-भात खाल त्याचा फायदा होईल.
तणावापासून मुक्ती
दही तुमचा तणाव दूर करतं. काही अभ्यासांनुसार, दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया तुमचा तणान दूर करून तुम्हाला शांत करतात.