दात दुखल्यास ७० टक्के रुग्ण करतात रुट कॅनल: दात काढा म्हणणारे २० टक्के
By शीतलकुमार कांबळे | Published: March 6, 2023 01:44 PM2023-03-06T13:44:10+5:302023-03-06T13:44:52+5:30
राष्ट्रीय दंतवैद्यक दिवस: औषधावर भागविणाऱ्यांची संख्या मोठी
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : माणसाचे व्यक्तिमत्व अधिक सुंदर दिसण्यासाठी त्याचे दाताच्या सुंदर असणे अधिक गरजेचे असते. पण, एखाद्याचा दात दुखू लागला तर त्याचा त्रास हा सहन करण्यापलीकडे असतो. त्यामुळे दंतवैद्याकडे जाण्याची गरज पडते. दंत वैद्यकाकडे गेल्यानंतर एकूण ७० टक्के रुट कॅनल करण्याला प्राधान्य देतात.
दातांना कीड लागणं हा तोंडामधील जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. दातांना कीड लागल्यामुळे तिथे छिद्र पडतात. या छिद्रामध्ये अन्नकण अडकतात. दातांचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. त्यालाच कॅव्हिटी म्हणतात. ही कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती दंत चिकित्सकाकडून भरून घेणे चांगले असते.
रुट कॅनल म्हणजे ?
या उपचारात दात व दाढेच्या किडलेल्या भागातून मुळामध्ये असलेल्या रूट कॅनलपर्यंत जाऊन जंतुसंसर्ग झालेला भाग साफ केला जातो. तिथली पोकळी निर्जंतुक केली जाते. जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग काढून टाकताना मधूनमधून दातात जंतुनाशक औषधांचा फवारा केला जातो. रूट कॅनलच्या निर्जन्तुक झालेल्या पोकळीत औषधी कोन भरले जातात व त्या पोकळीचे फिलिंग केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला रूट कॅनल म्हणतात.
दात दुखल्यास रुग्ण काय करतात ?
रुट कॅनल - ७० टक्के
दात काढणे - २० टक्के
फक्त तात्पुरते औषध घेणे - १० टक्के
कोणत्या प्रकारचे कॅप प्राधान्याने लावतात
सिरॅमीक कॅप - ७० टक्के
धातूची कॅप - २५ टक्के
झिलकोनिया कॅप - ५टक्के
दात किडल्याचे माहिती झाल्यानंतर लगेच उपचार घेणे गरजेचे असते. अनेकदा रुग्ण हे डॉक्टरांकडे उशीरा येतात. त्यामुळे आजार तर वाढतोच सोबत उपचाराचा खर्च आणी त्रासही वाढतो. दात दुखत असल्यास औषध दुकानातून स्वताहून औषध घेणे धोक्याचे ठरते. दर सहा महिन्याला दातांची तपासणी करुन घेतल्यास आजार आणखी वाढत नाही.
- डॉ. किरण किणीकर, दंतरोग तज्ज्ञ