मलेरियामुळे ५ वर्षांत ७८ मृत्यू; ७२ हजार जणांना लागण; वेळीच लक्षणं ओळखा, उपचार घ्या
By संतोष आंधळे | Published: April 25, 2024 07:58 AM2024-04-25T07:58:42+5:302024-04-25T07:59:21+5:30
वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
मुंबई : शहरातील इमारतीचे बांधकाम, तसेच रस्त्याच्या डागडुजीचे काम वर्षभर सुरू असते. यामुळे विशेष करून पावसाळ्यात मलेरियासारख्या आजाराची साथ पसरते. त्यामुळे रुग्णाची संख्या वाढते. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत या आजारामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ७२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना याची लागण झाली आहे. हा आजार झाल्यानंतर त्याची वेळीच काळजी घेणे गरजचे आहे. अन्यथा गुंतागुत निर्माण हाेऊन हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डास चावल्यामुळे होणारा मलेरिया हा आजार असून, ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो. ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करून अंडी घालत असल्यामुळे या आजराचा त्रास होऊ नये, म्हणून या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत जाते. काही वेळा उपचाराचा भाग म्हणून बाहेरून सुद्धा प्लेटलेट्स दिल्या जातात. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. मलेरिया आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
बचाव कसा कराल ?
लहाने मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना या आजाराचा धोका सर्वात जास्त प्रमाणात असतो, कारण या दोघांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. डास एका जागी बसू नये, म्हणून घरात पंखा, एसीचा वापर करावा, तसेच संध्याकाळच्या वेळेत दरवाजे बंद असावेत, तसेच खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात, असे डॉक्टर सांगतात. तसेच, डास मारण्याच्या औषधाचा वापर करावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
मलेरियाची लक्षणे कोणती?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे. मलेरियाचा डास चावल्यानंतर १०-१५ दिवसांत ही लक्षणे दिसतात.
मलेरियाचे चार प्रकार आहेत. त्यानुसार आपण औषधे रुग्णांना देतो. मलेरिया सुरुवातीच्या काळात व्यवस्थित उपचार घेतला, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मलेरियाच्या अधिक गुंतागुंतीमुळे त्याचा परिणाम शरीरावरील विविध अवयवांवर होऊन तो रुग्ण मृत पावल्याच्या घटना घडतात. विशेषकरून मलेरियाचा यकृत, फुप्फुस, मेंदूवर परिणाम होतो. काही वेळा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागते. आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र, सर जे. जे. रुग्णालय.