म्युकर मायकोसिसचे ८ बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 02:25 PM2021-05-21T14:25:29+5:302021-05-21T14:26:06+5:30
नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकर मायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकर मायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईड आणि तत्सम इंजेक्शनच्या वापरामुळे नाशिक शहरात आतापर्यंत१२७ तर जिल्ह्यात एकूण मिळून १८९ रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव आणि नाशिक शहरातच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण असण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक,कान,घसा तज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांचाच भरणा अधिक आहे.
३४ रुग्ण बरे झाल्याची नोंद
नाशिक शहरात १२७ तर जिल्ह्यात एकूण १८९ म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची अधिकृतरित्या नोंद झालेली आहे. त्यातील १२९ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, २४ रुग्ण अधिग्रहीत कोविड सेंटरमध्ये तर २ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. आतापर्यंत त्यातील ३४ रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अधिकृत नोंदीपेक्षाही ज्यांना या आजाराचा त्रास होऊनही त्याबाबत फारशी माहितीच नाही किंवा कोरोनाच्या दुष्परिणामामुळे असा त्रास होत असेल, असाच ज्यांनी समज करुन घेतला अशा रुग्णांची संख्या अधिकृत नोंदीपेक्षाही अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.