अपुऱ्या झोपेमुळे ८१ टक्के मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त: सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:01 PM2019-04-03T21:01:40+5:302019-04-03T21:01:48+5:30
असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे.
मुंबई : मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. ८१% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपु-या झोपेमुळे ७८ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.
सातत्यपूर्ण अपुऱ्या झोपेचे आपले मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुऱ्या झोपेमुळे ५२ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. सर्वेक्षणातून असे दिसून आले की ३६ टक्के लोक ७ तासांपेक्षा ही कमी झोपतात. तर ९० टक्के लोकांना लोकांना रात्रीत १-२ वेळा जाग येते.
मुंबईकरांना रात्रभर जागवणा-या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी व्यासपीठे जबाबदार आहेत. सुमारे ९० टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. २४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणा-यांची संख्या २३ टक्के इतकी आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मधून आपल्याला याची कल्पना येते की भारतीय लोक कसे या समस्यांकडे अजून दुर्लक्ष करत आहेत. यापेक्षा जास्त चिंतेची बाब ही आहे की, त्यापैकी बहुतांशी लोक झोपेसंबंधीच्या विकारांना खरी समस्या मानतच नाहीत. आम्ही भारतीयांचे एकंदर निद्रा-स्वास्थ्य सुधारण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहोतच पण याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.