रोज एक फळ ठेवेल आयुष्य निरोगी आणि सुंदर! बघा हिवाळ्यात कोणत्या फळांचा घेता येईल आस्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:38 PM2022-11-03T12:38:53+5:302022-11-03T12:40:03+5:30
कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता.
निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर तसा नियमित आहारही हवा. आजकाल वेळेची कारणे देत अनेक जण केवळ जंक फूड खाण्याकडे वळले आहेत. हे शरिरासाठी घातक आहेच मात्र फक्त बाहेरचे अन्नपदार्थ खाऊन उपयोग नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसा समतोल राखणेही आवश्यक आहे. हा समतोल राखण्यासाठी रोज किमान एक तरी फळ खाणे गरजेचे आहे. कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या ऋतूत जी जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता. फळांमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. फळांमुळे रोगप्रतिकारकशक्ती तर वाढतेच सोबतच डोळे निरोगी राहतात आणि पचनक्रियाही सुधारते.
फळ खाण्यापुर्वी हे लक्षात घ्या
कोणतेही फळ हे स्वयंपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे फळ खाण्यापुर्वी आणि खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास जेवण करु नये. फळामध्ये असलेले सर्व जीवनसत्वे शरिराला मिळणे गरजेचे आहे. म्हणून रिकाम्या पोटी फळ खाणे कधीही चांगले.
हिवाळ्यात खावी अशी फळे कोणती ?
थंडीत फ्लू तसेच इतर आजार लगेच पसरतात. अशावेळी फळांमुळे जीवनसत्वे जास्तीत जास्त मिळतात. कधीही आजारी पडल्यावर डॉक्टरही नेहमी फळे खाण्याचाच सल्ला देतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यासाठी फळे खाणे रामबाण उपाय आहे.
सफरचंद
सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात येतो. ताजी ताजी आणि रसरशीत सफरचंद हिवाळ्यात येतात. सफरचंदात भरपूर फायबर, जीवनसत्वे सी आणि के असतात. यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंदाचा रस पिणेही शरिरासाठी उत्तम आहे.
सीताफळ
सीताफळ अनेकांना आवडत नाही. मात्र थंडीत सीताफळ आवर्जुन खावे. सीताफळमध्ये व्हिटॅमिन ६ चे प्रमाण अधिक असते. विशेषकरुन लहान मुलांसाठी सीताफळ अत्यंत गुणकारी आहे.
डाळिंब
थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. थंडीत त्वचा कोरडी पडते यासाठी डाळिंब गुणकारी आहे.
पेरु
गोड, रसरशीत पेरु बघितलेच की तोंडाला पाणी सुटते. पेरुमध्येही व्हिटॅमिन सी आणि अॅंटिऑक्सीडंटचे घटक आढळतात. पेरुमुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी सामना करण्यास तयार होते.
संत्री
संत्री हा व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. संत्री ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरते. त्यातच डिसेंबर मध्ये येणारी संत्री ही चवीला अत्यंत गोड असतात. मात्र सर्दी, खोकला झाला असल्यास शक्यतो संत्री खाणे टाळावे.