नाव आठवत नाही? वरण-भात, भाजी-पोळी खा!; अमेरिकेच्या संशोधनातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:25 AM2023-12-06T07:25:45+5:302023-12-06T07:26:04+5:30
पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे
नवी दिल्ली : पाश्चिमात्य आहारपद्धतीच्या तुलनेत भारत, जपान, चीनसारख्या देशांमध्ये प्रचलित असलेल्या पारंपरिक आहारपद्धतीमुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.
अमेरिकेतील सनलाइट, न्यूट्रिशिअन अँड हेल्थ रिसर्च सेंटरने हे संशोधन केले. त्याबाबत जर्नल ऑफ अल्झायमर डिसिज या नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे
फारशा शारीरिक हालचाली नसणे धोकादायक
संशोधकांनी म्हटले आहे की, फारशा शारीरिक हालचाली न करणे तसेच स्थूलता यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. आपली जीवनशैली तसेच आहारपद्धती या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लोकांनी चुकीच्या जीवनशैलीचा अंगीकार करणे टाळले पाहिजे. वनस्पतीजन्य आहारपद्धतीमुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात, असेही संशोधकांनी सांगितले.
मधुमेह का वाढतो?
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूल तसेच मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अल्झायमर होण्यासाठी हे खाद्यपदार्थ कारणीभूत ठरू शकतात. वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये असलेले व अल्झायमरला दूर ठेवणारे घटक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये आढळून येत नाहीत, असे हार्वर्ड विद्यापीठातील न्यूट्रिशिअन, प्रा. एडवर्ड गिओवानुस्सी यांनी सांगितले.
काय खाल तर वाढेल धोका?
चरबीयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात होणारे सेवन, रेड मीट (लाल मांस), हॅम्बर्गर, बार्बेक्यू, हॉट डॉग्ज, साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ अशा गोष्टी आहारात असतील तर त्यामुळे अल्झायमर आजार होण्याचा धोका वाढतो. मीटमुळे शरीरात इन्सुलिनला प्रतिरोध, जळजळ अशा अनेक गोष्टींमध्ये वाढ होऊन हा आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र, हिरव्यागार भाज्या, फळे तसेच भाज्या, ओमेगा-३ फॅटी असिड, विविध प्रकारची धान्ये यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो, असे या संशोधनातील निष्कर्षांत म्हटले आहे