HIV treatment:पॉझिटिव्ह बातमी! महिलेची HIV वर पूर्णपणे मात; 'या' तंत्रज्ञानामुळे घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 04:42 PM2022-02-16T16:42:15+5:302022-02-16T16:51:59+5:30
एक अशी उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे ज्यामुळे एचआयव्ही हा रोग पुर्ण बरा होऊ शकतो. या पद्धतीने एका महिलेवर उपचार करण्यात आला अन् ती एचआयव्ही मुक्त झाली.
एचआयव्ही हा असा आजार आहे ज्यावर पूर्ण बरं होण्यासाठीचे उपचार उपलब्ध नाहीत. पण आता एक अशी उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे ज्यामुळे हा रोग पुर्ण बरा होऊ शकतो. या पद्धतीने एका महिलेवर उपचार करण्यात आला अन् ती एचआयव्ही मुक्त झाली. न्यु यॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार स्टेम सेल्स ट्रान्स्प्लांटच्या मदतीने तिच्यावर उपचार करण्यात आले अन् ते यशस्वी ठरले.
काय आहे ही उपचाराची पद्धत?
यात नाळ म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड (umbilical cord) च्या रक्ताचा वापर केला जातो. यामध्ये डोनरच्या अम्बिकल कॉर्डमधुन जास्त स्टेम्स सेल्स मिळवण्याचीही गरज नसते जशी बोन मैरो ट्रान्सप्लांटमध्ये गरज पडते. तसंही एचआयव्हीच्या रुग्णांसाठी बोन मैरो ट्रन्साप्लांट ही उपचार पद्धती तितकीशी योग्य नसुन याचे घातक परिणामही होऊ शकतात. ही पद्धती अशा रुग्णांसाठी वापरली जाते जे कॅन्सरने पीडीत आहेत किंवा या उपचार पद्धतीशिवाय दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नाही.
आता पर्यंत संपुर्ण जगात केवळ दोनच रुग्ण एचआयव्ही मुक्त झाले होते. टिमोथी रे ब्राऊन हे १२ वर्ष या व्हायरस पासून मुक्त होते. २०२०मध्ये कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला. २०१९मध्ये एचआयव्हीने ग्रस्त अॅडम कॅस्टिलेजो यांचावर देखील यशस्वी उपचार झाले होते. या दोघांनाही दोन डोनरच्या मदतीने बोन मैरो ट्रान्सप्लांट करण्यात आला होता. विशेष म्हणजे या दोन डोनरमध्ये असे म्युटेशन मिळाले जे एचआयव्ही विषाणुला रोखु शकतात. अशा प्रकारचे दुर्मिळ म्युटेशन केवळ २० हजारपैकी एका डोनरमध्ये मिळु शकते. जे जास्तकरुन युरोपियन देशांमध्ये असतात.
रुग्णावर उपचार करणाऱ्या टीममधील डॉक्टर कॉएन वॅन बेसियन यांनी सांगितले, '' स्टेम सेलच्या नव्या उपचार पद्धतीमुळे रुग्णांना फारच मदत मिळेल".
त्या महिलेला होते हे रोग?
या महिलेला २०१३ साली एचआयव्ही झाल्याचे समजले. चार वर्षांनंतर तिला ल्युकेमेनिया झाल्याचेही समजले. या कॅन्सरमध्ये हॅप्लो कॉर्ड ट्रान्सप्लांट उपचार पद्धती अवलंबण्यात आली. ट्रान्सप्लांटच्या दरम्यान तिच्या एका नातेवाईकाने तिला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रक्त दिले. महिलेचे शेवटचे ट्रान्सप्लांट २०१७ साली झाले. मागील चार वर्षांपासून ती ल्युकेमेनियातुन पूर्ण बरी झालीय. ट्रान्सप्लांटच्या तीन वर्षांनंतर डॉक्टरांनी त्या महिलेवरील एचआयव्हीचे उपचार बंद केले आहेत पण त्यानंतर तिला कोणत्याही विषाणूचा त्रास झालेला नाही.
कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीचे एड्स तज्ज्ञ डॉक्टर स्टीवन डिक्स यांच्या म्हणण्यानुसार, या महिलेचे आईवडिल श्वेत अन् अश्वेत अशा दोन्ही वर्णाचे होते. दोन वंश एकत्र आल्यामुळे तसेच ती महिला असल्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या या गोष्टी महत्त्वाच्या आणि फायद्याच्या ठरल्या. ते पुढे असेही म्हणाले की स्त्रीच्या गर्भातील नाळ ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. त्याच्या पेशी आणि रक्त रुग्णांना फायदेशीर ठरतात.