आयुर्वेदानुसार कुणी खाऊ नये दूध आणि दही? शरीरात जमा होतील विषारी पदार्थ...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:23 AM2024-09-06T10:23:26+5:302024-09-06T10:24:36+5:30
Health Tips : बऱ्याच लोकांना ही समस्या होते की, ते पौष्टिक आहार घेऊनही कमजोर असतात किंवा आजारी पडत असतात. याचं कारण तुमचं फूड कॉम्बिनेशन योग्य नसू शकतं.
Health Tips : आयुर्वेदात खाण्या-पिण्याच्या पद्धतींबाबत खूप काही सांगण्यात आलं आहे. तुम्ही काय खात आहात, कधी खात आहात, कसे खात आहात आणि कशासोबत काय खात आहात या सगळ्या गोष्टींचा आरोग्यावर प्रभाव पडतो.
बऱ्याच लोकांना ही समस्या होते की, ते पौष्टिक आहार घेऊनही कमजोर असतात किंवा आजारी पडत असतात. याचं कारण तुमचं फूड कॉम्बिनेशन योग्य नसू शकतं. आयुर्वेदात याला विरूद्ध आहार म्हटलं जातं. याचा अर्थ असा की, तुम्ही अशा गोष्टी एकत्र खात आहात ज्या एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, विरुद्ध आहारात येणाऱ्या गोष्टी फायद्यांपेक्षा नुकसान जास्त करतात. उदाहरण द्यायचं तर बरेच लोक दूध आणि केळ सोबत खातात. हे आयुर्वेदानुसार चुकीचं आहे.
दूध आणि मासे
दूध कधीही मास्यांसोबत खाऊ नये. कारण दोन्ही गोष्टी विरूद्ध आहेत. दूध थंड असतं आणि मासे गरम असतात. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने रक्त दुषित होऊ शकतं. तसेच मीठ आणि दूध एकत्र खाणंही टाळलं पाहिजे.
केळ आणि दूध
केळ कधीच दूध, दही किंवा छाससोबत खाऊ नये. कारण याने तुमची पचनक्रिया कमजोर होते आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. यांचं एकत्र सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि एलर्जी होऊ शकते.
रात्री खाऊ नये दही
दही जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात खातात. दह्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. पण याचं रात्री सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. याने पोटासंबंधी समस्या वाढण्याचा धोका असतो.
मध आणि तूप
मध गरम केल्याने त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात. त्यामुळे विषारी पदार्थ जमा होतात. मध आणि तूप समान प्रमाणात कधीच सेवन करू नये कारण याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
कुणी खाऊ नये पनीर?
दही कधीही दुपारच्या जेवणासोबत खावं. कारण याने पचनक्रिया मजबूत होते. तेही तुमचं पचन तंत्र मजबूत असेल तर खावं. जर असं नसेल तर दह्यामुळे सूज येऊ शकते आणि पित्त व कफ वाढू शकतो. पनीर पचवण्यास बराच वेळ लागतो. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होण्याचा धोका असतो. पचन तंत्र कमजोर असलेल्या लोकांनी पनीरचं सेवन करू नये.