सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा, वाचाल तर रोज लवकर उठाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:48 AM2024-08-14T11:48:33+5:302024-08-14T12:10:23+5:30
Waking up early Benefits : डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये आणखी एका रिसर्चची भर पडली आहे.
Waking up early Benefits : वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल भरपूर लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात सर्वात जास्त लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वात जास्त कशाचा फटका बसत असेल तर ते आहे डिप्रेशन. डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये आणखी एका रिसर्चची भर पडली आहे.
झोपेतून लवकर उठण्याचा फायदा
एका रिसर्चनुसार, ज्या लोकांमध्ये अनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये 'बॉडी क्लॉक' संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे याचा मानसिक आरोग्य आणि आजारांशी कसा संबंध आहे.
मेंदुची क्षमता वाढते
सकाळी आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनची निर्मिती अधिक होत असते. या हार्मोनच्या मदतीने स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी झोपेतून लवकर उठल्याने दिवसभर आपलं शरीर तणावमुक्त राहतं. तसेच सकाळी फ्रेश हवेत श्वास घेतल्याने मेंदुमध्ये रक्तसंचार वाढतो ज्यामुळे विचार करण्याची, समजण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक वाढते.
सकाळी लवकर उठण्याचे फायदे
१) सकाळी लवकर उठल्याने स्वच्छ ऑक्सिजन मिळतं. यामुळे श्वासासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो आणि फफ्फुसंही चांगले राहतात.
२) सकाळी उठून व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे हृदय निरोगी राहतं.
३) अनेक मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसेच सकाळी उठून योग्याभ्यास करण्याचेही अनेक फायदे आहेत.
४) सकाळी लवकर उठल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं, यामुळे काम करण्यात अधिक लक्ष लागतं. म्हणजे कामही चांगलं होतं आणि आनंदही मिळतो.
सकाळी जबरदस्तीने उठण्याचे नुकसान
ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीतील संशोधिका कॅथरीना वुल्फ यांच्यानुसार, जेव्हा एखाद्याला जबरदस्तीने त्याच्या बॉडी क्लॉक विरूद्ध सकाळी लवकर उठण्यास किंवा जागण्यास सांगितलं जातं तेव्हा याचाही वाइट प्रभाव पडतो. शरीरासोबत केलेली जबरदस्ती कधीही फायद्याची ठरत नाही. लोकांना त्यांच्या सिर्काडियन क्लॉक म्हणजेच शरीराच्या जैविक घड्याळीप्रमाणे सगळं करू दिलं, तर त्यांचं परफॉर्मंन्स चांगलं होतं. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्याला सकाळी लवकर उठण्यास सांगण्यात आलं तर त्याला आळस आलेला असेल. त्याचं कामात अजिबात लक्ष लागणार नाही. मेंदुचाही वापर तो चांगल्याप्रकारे करू शकणार नाही आणि अशात त्याचं वजन वाढू शकतं.
सकाळी झोपेतून लवकर उठण्यासाठी काय करावे?
उशीरा झोपण्याची सवय बदला
रात्री उशीरा झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला तुम्हाला शक्य होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दूध घ्या. थोडं चला. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.
प्रयत्न सोडू नका
जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही, तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे. ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.
आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा
सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे-छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी झोपा व दुसऱ्या दिवशी १५ मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुसऱ्या दिवसापासून ३० मिनिटे आधी झोपा व ३० मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
दुपारी झोप घेण्याचे टाळा
कधीही दुपारी झोपू नका. कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही. दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टीत किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवा.