सारा अली खान पीसीओडी आजाराने ग्रस्त, काय आहेत आजाराची लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:29 AM2018-11-21T10:29:10+5:302018-11-21T10:30:36+5:30
अभिनेत्री सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. सारा आपल्या बोलकेपणासाठी आणि सौंदर्यासाठी सतत चर्चेत असते.
अभिनेत्री सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. सारा आपल्या बोलकेपणासाठी आणि सौंदर्यासाठी सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये तिने सांगितले की, ती पीसीओडी नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. तज्ज्ञांनुसार, जाड महिलांमध्ये दिसणारा हा सामान्य रोग आहे. पण याबाबत अनेक महिलांना माहितीच नाही किंवा याबाबत अनेकांनी ऐकलही नाहीये. एका आकडेवारीनुसार, भारतातील १० पैकी एका मुलीमध्ये हा आजार आढळतो.
काय आहे हा आजार?
पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम या आजारात ओवरी म्हणजेच बीजांडकोशात एकापेक्षा जास्त गाठी होतात. या गाठी होण्याचं मुख्य कारण मासिक पाळीमध्ये अनियमीतता सांगितलं जातं. बीजांडकोश हा प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. मासिक पाळीमध्ये अनियमीतता आल्याने ओवरीचा आकार वाढतो. त्यामुळे यात एंड्रोजन आणि अॅस्ट्रोजन नावाचे हार्मोन्स अधिक प्रमाणात तयार होतात. पॉलिसिस्टीक ओवरी सामान्य ओवरीच्या तुलनेत आकाराने जास्त असतात. याला स्टीन लिवंथन सिंड्रोम असेही म्हटले जाते. पीसीओडी या आजारामुळे गर्भावस्था, मासिक पाळी, डायबिटीज यांसारख्या आजारांची समस्या वाढू शकते.
आजाराची लक्षणे
या आजाराच्या लक्षणांबाबत सांगायचं तर वजन वाढणे, शरीराच्या वेगवेगळ्या भागात अनावश्यक केस येणे, केस पातळ होणे, पिंपल्स, पेल्विक पेन, डोकेदुखी, झोपेची समस्या आणि मूड स्विंग हे सांगता येतील. जास्तीत जास्त लक्षणे ही तारुण्यात आल्यावर लगेच बघायला मिळतात आणि लवकरच ते अधिक वाढतात. तसेच ज्या महिला कमी झोप घेतात त्यांना पीसीओडी होण्याचा धोका अधिक असतो. ज्या महिला जीवनशैलीमुळे पीसीओडीच्या शिकार होत आहे, त्या काही योगाभ्यास करुन निरोगी जीवन जगू शकतात.
मेल हार्मोन्स वाढल्याने चेहऱ्यावर केस वाढतात
पीसीओडी हा आजार झाल्याने मुलींच्या शरीरात मेल हार्मोन टेस्टोस्ट्रेनरॉनचा स्तर वाढतो. या कारणाने चेहऱ्यावर केस अधिक येऊ लागतात. तसेच या आजाराने ग्रस्त व्यक्तींना वजन कमी करणे कठीण असतं. चेहऱ्यावर पिंपल्सही जास्त प्रमाणात दिसायला लागतात. गेल्या ५ ते ८ वर्षात हा आजार अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. खासकरुन वजन वाढलेल्या मुलींना हा आजार अधिक प्रमाणात आपल्या जाळ्यात घेतो आहे. एक्सरसाइजची कमतरता, शारीरिक श्रम कमी होणे आणि आहाराबाबत चुकीच्या सवयी यामुळे पीसीओडी हा आजारा वेगाने वाढत आहे.
इन्फर्टिलिटीचा धोका
तज्ज्ञांनुसार, पीसीओडी हा आजार मेटाबॉलिज्मशी निगडीत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या लाइफस्टाइलमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. मोठी अडचण ही आहे की, पुन्हा पुन्हा हा आजार झाल्यास यावर मात करणे कठीण होऊन बसतं. याने पुढे जाऊन डायबिटीज आणि इन्फर्टिलिटीचा धोका वाढतो. जंक फूडऐवजी हेल्दी आहार घेऊन आणि शारीरिक श्रम वाढवून या स्थितीत सुधारणा करता येऊ शकते.