Adenovirus : पश्चिम बंगालमध्ये नवीन व्हायरसमुळे खळबळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, 'ही' आहेत लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:41 AM2023-02-23T11:41:56+5:302023-02-23T11:43:20+5:30
Adenovirus Flu Symptoms : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसने कहर केला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना व्हायरसमुळे देशासह जगभरात हाहाकार माजला आहे. दरम्यान, आता एका नवीन व्हायरसने खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसने कहर केला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या व्हायरसचे नाव एडेनोव्हायरस (Adenovirus) आहे. पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसची अनेक प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर प्रशासनही अलर्टवर आहे.
बदलत्या ऋतूत लोकांना आजारांचाही धोका असतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, एडेनोव्हायरस हा असा व्हायरस आहे, ज्यामुळे सामान्यतः श्वसनाचे आजार, सौम्य सर्दी किंवा फ्लूसारखे आजार होतात. एडेनोव्हायरसच्या कारणांमध्ये इन्फ्लूएंझा, पॅराइन्फ्लुएंझा, राइनोव्हायरस आणि न्यूमोकोसी यांचा समावेश आहे.
लक्षणं
एडेनोव्हायरस संसर्गाच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, सर्दी, अतिसार, उलट्या आणि जलद श्वास घेणे यांचा समावेश आहे. या व्हायरसमुळे लहान मुले, आधीच श्वसन रोग आणि इतर गंभीर आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो.
उपचार
एडेनोव्हायरस फ्लूवर कोणताही इलाज नसला तरी, सौम्य लक्षणांवर ओआरएस, सकस आहार आणि लक्षणात्मक काळजी घेऊन घरीच उपचार करता येतात. जर ताप 3-5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा तुम्ही श्वासोच्छवास जलद किंवा ताणतणाव घेत असल्यास, भूक न लागणे आणि दिवसातून पाचपेक्षा कमी वेळा लघवी होत असल्यास, रुग्णालयात जा आणि स्वतःची तपासणी करा.
बचाव
प्रतिबंधासाठी मास्क घालणे, हाताची स्वच्छता राखणे आणि कोरोना व्हायरसप्रमाणेच इतर उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.