हाडांच्या बळकटीसाठी आत्तापासूनच 'या' सवयी लावून घ्या, आजारांपासून राहाल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 10:59 AM2022-11-05T10:59:07+5:302022-11-05T11:00:38+5:30
वय वाढले की गुडघेदुखी, पाठदुखी सुरु होते. तेव्हा कमी त्रास व्हावा म्हणून तरुणपणीच काही सवयी लावून घेणे गरजेचे असते.
हाडं मजबूत असतील तर तुम्ही तंदुरुस्त आहात असंच कोणतेही डॉक्टर सांगतील. यासाठी नियमित चालणे, धावणे थोडक्यात काय तर शरिराची हालचाल व्हायलाच हवी तरच हाडं मजबूत राहतील. सोबतच तसा पोषक आहार घेणे सुद्धा महत्वाचे आहे. हाडं निरोगी तर शरीर निरोगी. हाडांची काळजी घेण्याचा फायदा तरुणवयात नाही तर उतारवयात समजतो. वय वाढले की गुडघेदुखी, पाठदुखी सुरु होते. तेव्हा कमी त्रास व्हावा म्हणून तरुणपणीच काही सवयी लावून घेणे गरजेचे असते. हाडे मजबूत करण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते कॅल्शियम. म्हणूनच लहानपणापासूनच आपल्याला दूध प्यायची सवय लावली जाते. कारण दुधात सर्वात जास्त कॅल्शियम आहे. आणखी कोणकोणत्या उपायांनी हाडे मजबूत होतात बघुया
हाडं निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामासोबत पोषक आहार घ्यावा. प्रोटीन आणि जास्तीत जास्त कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
दूध किंवा दूग्धजन्य पदार्थ
सर्वात जास्त कॅल्शियम कशात असेल तर ते दुधामध्ये. दूध कॅल्शियम आणि प्रोटीन ने भरपूर आहे. नियमित एक कप दूध प्यायल्यानेही बराच फायदा होतो. दूध आवडत नसेल तर पनीर, दही, लोणी, तूप यांचाही आहारात समावेश करा.
बदाम
बदामातून खूप प्रोटीन मिळते जे शरिरासाठी लाभदायक आहे. अनेक घरांमध्ये रात्रीच बदाम भिजवून ठेवले जातात आणि सकाळी सर्वजण ते खातात. बदामाने बुद्धी तर वाढतेच तसेच हाडांनाही बळकटी येते. बदामासोबतच इतरही सुकामेवा आरोग्यासाठी हितकारक आहे.
तीळ
तीळात प्रचंड कॅल्शियम आहे. त्यामुळे आहारातील विविध पदार्थांमध्ये तीळाचा समावेश असतो. यामुळे हाडांना मजबुती येते.
हिरव्या भाज्या
लहानपणी पालेभाज्या खा म्हणून सगळे का आग्रह करतात ते यासाठीच. लहानपणापासूनच पोषक आहार घेण्याची सवय लागावी हा यामागचा हेतू. पालक, मेथी, शेपू, या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे मुबलक प्रमाणात आढळते. यासाठी पालेभाज्या पोटात गेल्याच पाहिजे.
मांसाहार
अर्थात जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी, मासे हे खूप फायदेशीर आहे. यामधूनही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळते. तसेच पायासूप सुद्धा हाडांना बळकटी आणते.
हाडांच्या आरोग्यासाठी असा करा व्यायाम
चालणे, धावणे, दोरीच्या उड्या, सायकल चालवणे यापैकी कोणताही व्यायाम केल्यास तुम्ही रोज प्रसन्न आणि तंदुरुस्त राहू शकता. यामुळे हाडेच काय तर शरिरातील प्रत्येक अवयव निरोगी राहण्यास मदत होते. दररोज व्यायाम केल्याने स्नायूंची लवचिकता वाढते. हाडे व स्नायू मजबूत होतात. वजनही आटोक्यात राहते.