अडुळसा वनस्पती आहे बहुगुणी, उपाय असे की तुम्ही कधी विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:36 PM2021-06-29T20:36:24+5:302021-06-29T20:38:39+5:30
सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवर अडुळसा रामबाण इलाज आहे. पण अडुळश्याचे फायदे इतकेच नाहीत. अडुळसा इतर अनेक आजारांवरही गुणकारी आहे.
अडुळसा ही औषधी वनस्पती खूपच गुणकारी आहे. या औषधीमध्ये असे काही गुण आहेत ते मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवर अडुळसा रामबाण इलाज आहे. पण अडुळश्याचे फायदे इतकेच नाहीत. अडुळसा इतर अनेक आजारांवरही गुणकारी आहे. वाचुयात आयुर्वेदिक डॉक्टर मनीष सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या संकेतस्थळाला सांगितलेले अडुळशाचे फायदे.
अडुळसा म्हणजे काय?
अडुळसा हे दोन-तीन फूट उंचीचे छोटीसी झुडूप असते. ही वनस्पती सदैव व हिरवीगार असते तिला फुले व टोकाला फळे असतात. या वनस्पतीची लागवड पावसाळ्यात केली जाते.
घशात खवखव, टीबी, ब्रॉँक्राईटीस यांच्यावर उपाय
अडुळसा कफनाशक आहे. खोकला येत असून ताप येत असेल तर अडुळशाच्या रसाने कमी होतो. सर्दी आणि खोकल्यावर हे औषध अनेक दशकांपासून वापरलं जात आहे. त्याचबरोबर डेंग्य, ब्रॉंक्राईटीस, गळ्यात सुज येणे, डायरिया, हार्टबर्न, अस्थमा या आजारांवर अडुळसा उत्तम उपाय आहे. अडुळशाची ७-८ पानं पाण्यात उकळा आणि नंतर हे पाणी गाळून त्यात मध मिसळून प्या.
विषाणूच्या संसर्गावर उपचार
अडुळशाचे अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गावर उपचार करण्यास सक्षम असतात. अडुळसा शरीराचं तापमान कमी करतं, चोंदलेलं नाक मोकळं करतं. ज्यामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो आणि आजार बरा होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो. जर तुम्हाला त्वचेवर बॅक्टेरिअल फंगल इन्फेक्शन असेल तर त्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावा
जखम झाल्यास, तोंडात व्रण उमटल्यास करा वापर
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते. रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. १० मि. लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते. तुमच्या तोंडात जर छाले उमटले असतील तर त्यावरही अडुळसा इलाज आहे.
अर्थराईटीस किंवा सांधेदुखीवर
सांधेदुखीमुळे दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. युरिक अॅसिडची शरीरातील वाढलेली पातळी अशा वेदनांना कारणीभूत आहे. अडुळसा युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यात मदत करत असल्याने वेदना कमी करते. या औषधी वनस्पतीचे सूज विरोधी गुणधर्म सांध्यातील सुजेस कमी करण्यास मदत करतात.