वाढत्या वयात महिलांना 'या' समस्यांचा करावा लागतो सामना; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:59 IST2019-10-28T11:58:31+5:302019-10-28T11:59:19+5:30
वाढत्या वयानुसार प्रत्येकाला शरीराच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यातल्यात्यात महिलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

वाढत्या वयात महिलांना 'या' समस्यांचा करावा लागतो सामना; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात
वाढत्या वयानुसार प्रत्येकाला शरीराच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यातल्यात्यात महिलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या वयानुसार, शरीरामध्ये मेटाबॉलिज्म आणि पोषक तत्वांची कमतरता जाणवू लागते. महिलांना वयाच्या पस्तीशीनंतर हाडं कमजोर होणं, डायबिटीज, हृदयाशी निगडीत आजार, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या अनेक समस्या होण्याचा धोका संभवतो. यांपासून बचाव करण्यासाठी वेळीच सावध होणं आणि त्यावर उपाय करणं गरजेचं असतं.
1. डायबिटीज
सध्या अनेकजणांना डायबिटीजची समस्या असल्याचे ऐकायला मिळते. चुकीचं राहणीमान हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण आहे.जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं त्यावेळी त्या व्यक्तीला डायबिटीजची समस्या होते. याचसोबत हृदयाशी निगडीत आजार, किडनीचे विकार, स्मरणशक्ती कमजोर होणं, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
अशी घ्या काळजी -
डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी फक्त साखरचं नाही तर तेल आणि मीठाचंही जास्त सेवन करणं टाळावं. ड्राय फ्रुट, फळं, भाज्या, डाळी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
2. हृदयाचे आजार
जास्त कोलेस्ट्रॉल असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने हृदयाचे आजार आजार होण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल लेवल वाढवण्यासाठी हे सर्वात महत्वाचं कारण आहे. यामध्ये धमण्या ब्लॉक होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पस्तीशीनंतर आहारावर नीट लक्ष दिले नाही तर समस्या वाढू शकता.
अशी घ्या काळजी -
आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आहारामध्ये फायबरयुक्त आहार, ताजी फळं, हिरव्या भाज्या, ताजी फळं यांचा समावेश करा. दररोज कमीतकमी 30 मिनिटं व्यायाम किंवा योगा करा.
3. हाडांची कमजोरी
वयाच्या पस्तीशी चाळीशीनंतर मोनोपॉजची वेळ जवळ आल्यानंतर शरीरामध्ये हाडांची कमजोरी जाणवू लागते. यामुळे सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, अर्थरायटिस यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
अशी घ्या काळजी -
या आजारांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आपल्या आहारामध्ये थोडासा बदल करून पौष्टीक पदार्थांचा समावेश करावा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, कॅल्शिअमयुक्त आहार, दूध, दही, ताक, पनीर, चीज, बटर, तूप यांसारख्या पदार्थांचा सामावेश करा. याव्यतिरिक्त वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जास्त वजन वाढू देऊ नका किंवा वजन कमी देखील होऊ देऊ नका.