कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 02:44 PM2022-11-10T14:44:25+5:302022-11-10T14:44:38+5:30
मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं.
मुंबई - भारतात अचानक गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचं कळतंय. सध्या गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते.
मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं. या केंद्रीय पथकात नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्याचं नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव करत आहेत. TOI रिपोर्टनुसार, गोवर हा संसर्गजन्य रोग असून कमी काळात त्याचे २९ हून अधिक रुग्ण आढळले.
अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. ज्यात काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटलं की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे.
काय आहेत गोवरची लक्षणे?
सीडीसीनुसार, गोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर २-३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत.