पालिकेच्या सर्व रुग्णालयात आता एनसीडी कॉर्नर
By स्नेहा मोरे | Published: September 6, 2022 09:21 PM2022-09-06T21:21:14+5:302022-09-06T21:21:49+5:30
सायन रुग्णालयातील केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयात सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पालिकेने मुंबईकरांच्याआरोग्याचा विचार करून लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र सुरू केले आहे. महिन्याभरापूर्वी सुरू केलेल्या या केंद्राला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने आता पालिकेने शहर उपनगरातील सर्व रुग्णालयांमध्ये अशा स्वरूपाची केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये इत्यादी ठिकाणीही अशाप्रकारचे आणखी १५ केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार या कक्षाची चाचणी क्षमता वाढविली जाऊ शकेल अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या वैद्यकीय संचालक डॉ नीलम आंद्राडे यांनी दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र हे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधी दरम्यान नागरिकांच्या सेवेत असेल. तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत हा कक्ष सुरु असणार आहे. या कक्षामध्ये रक्तदाब व मधुमेह चाचण्या मोफत असणार आहेत.बाह्यरुग्ण विभागात नोंदणीसाठी येणारे रुग्ण, रुग्णांसोबत येणारे नातेवाईक आणि नागरिक देखील रक्तदाब व मधुमेह चाचण्या करवून घेऊ शकतील असे या केंद्रांचे स्वरूप असणार आहे.
निदानानंतर पुढील उपचार नजीकच्या दवाखान्यात
असंसर्गजन्य आजारांमधे १९९० ते २०१९ या कालावधीत ३० टक्क्यांवरुन ५५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.वाढता तणाव, मधूमेह, रक्तदाब, अति प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप हे घटक या आजारांना कारणीभूत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेसह पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये सध्या ३१ ते ४० या वयोगटामध्येही उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण दिसून येते. अनेकदा या आजरांविषयी सामान्य अनभिज्ञ असतात, त्यामुळे पालिकेच्या सायन रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी सायन वा नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रामध्ये या आजारांची चाचणी करून घ्यावी. या चाचणी दरम्यान काही आजारांचे निदान झाल्यास पुढील औषधे नजीकच्या दवाखान्यात रूग्णांना मिळू शकतात. - डॉ. सीमा बनसोडे, प्रोफेसर आणि प्रिव्हेंटिव्ह ॲण्ड सोशल मेडिसिनच्या प्रमुख
सायन रुग्णालयातील केंद्रात ५०० व्यक्तींनी केली चाचणी
लोकमान्य टिळक रुग्णालयातील केंद्र सुरू झाल्यापासून सुमारे ५०० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यातील ५८ जणांना मधुमेह आणि ११६ जणांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. ४९ रूग्णांना दोन्ही आजार असल्याचे आढळून आले आहे.
उद्घोषणेद्वारे करणार जनजागृती
सायन रुग्णालयात या केंद्राविषयी अजूनही रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना माहिती नाही, त्यामुळे या केंद्र विषयी जनजागृती करण्यासाठी आता रुग्णालयात उद्घोषणा करण्यात येणार आहे. जेणकरून जास्तीत जास्त नागरिकांनी या चाचण्या करून घ्याव्यात अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
जीवनशैली बदलण्यावर भर देण्याची गरज
बदललेली जीवनशैली चोरपावलांनी आरोग्यावर कसा घातक हल्ला करत आहे. रोज अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे सांध्यांना व स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो, ते मजबूत होतात, मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन शरीर व मन दिवसभर प्रसन्न राहते, शिवाय ताणाचा निचराही होऊ शकतो.आहार चौरस व समतोल असावा. शक्यतो घरचे व ताजेच अन्न खावे. सकाळचा नाश्ता भरपूर घ्यावा. परंतु रात्रीचे जेवण मात्र कमीत कमी घ्यावे. आहारात फळे, सॅलॅड, पालेभाज्या यांचा आवर्जून समावेश असावा. रात्री लवकर जेवावे. जेवल्यानंतर ताबडतोब झोपू नये. शतपावली करावी. जेवल्यानंतर २ तासांनी झोपावे. चाळिशीनंतर प्रत्येकाने दरवर्षी पूर्ण तपासणी करून घ्यावी. यात मधुमेह, ब्लडप्रेशर, हार्ट अॅटॅक, कर्करोग यासारखे आजार शोधून काढता येतील. शरीर पोषणासाठी योग्य आहार, निरोगी, शक्तिमय, स्फूर्तिशाली, आरोग्यासाठी योग्य व्यायाम आणि ढालशाली, भक्कम मनासाठी - मानसिक संतुलन ठेवणं आवश्यक आहे, अशी माहिती डॉ बनसोडे यांनी दिली आहे.
आजपासून केईएम रुग्णालयातही एनसीडी कॉर्नर
सायन रुग्णालयानंतर आता परळ येथील केईएम रुग्णालयात ६ सप्टेंबर पासून एनसीडी कॉर्नर सुरू करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयामध्ये पहिल्या टप्प्यात एकच एनसीडी कॉर्नर सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात अन्य इमारतींच्या खाली हे कॉर्नर सुरू केले जातील. चार जणांचे पथक पहिल्या कॉर्नरवर कार्यरत असेल. त्यात एक शिकाऊ डॉक्टर, आशा सेविका, एक परिचारिका आणि एका कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे पथक कार्यरत असेल, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशसनाने दिली आहे.