CoronaVirus News: सर्वच अवयवांवर हल्ला चढवतोय कोरोना; देशातल्या पहिल्या ऑटॉप्सी रिपोर्टनं धडकीच भरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:46 PM2022-04-27T16:46:45+5:302022-04-27T16:49:05+5:30
देशात पहिल्यांदाच कोरोना मृतांची ऑटॉप्सी; धक्कादायक माहिती समोर; चिंता वाढली
भोपाळ: देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यातच आता एम्स भोपाळच्या संशोधनामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.
कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होत आहे. एम्स भोपाळनं कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचा अभ्यास केला. त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. भोपाळ एम्सच्या डॉक्टरांनी कोरोना मृतांची ऑटॉप्सी केली. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ९०.४ टक्के लोकांच्या फुफ्फुसांचं नुकसान झाल्याची माहिती ऑटॉप्सीतून समोर आली. तर ६६.६ टक्के व्यक्तींच्या किडनी आणि ५७ टक्के लोकांच्या यकृताला हानी पोहोचली, असं एम्सचं संशोधन सांगतं.
भारतात प्रथमच कोरोना मृतांची ऑटॉप्सी करण्यात आल्याचं एम्स भोपाळचे संचालक डॉ. सरमन सिंह यांनी सांगितलं. आतापर्यंत आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविडमुळे मृत पावलेल्यांची ऑटॉप्सी न करण्याचा सल्ला देत होतं. त्यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचं सिंह म्हणाले.
केवळ फुफ्फुस आणि यकृतच नव्हे, तर कोरोना विषाणू शरीराच्या जवळपास सर्वच अवयवांपर्यंत पोहोचतो, अशी माहिती सिंह यांनी दिली. एम्स भोपाळनं केलेलं संशोधन करेस जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये मार्च २०२२ मध्ये प्रकाशित झालं आहे.