ALERT : ​अशा लोकांची संगत नकोच !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 12:48 PM2017-03-19T12:48:47+5:302017-03-19T18:18:47+5:30

अशा लोकांसोबत राहणे म्हणजे निश्चितच आपला अमूल्य वेळ वाया घालवणे आणि आयुष्याच्या ध्येयापासून परावृत्त होणे होय.

ALERT: Do not want to be associated with such people! | ALERT : ​अशा लोकांची संगत नकोच !

ALERT : ​अशा लोकांची संगत नकोच !

Next
ong>-Ravindra More
मनुष्य समाजशील प्राणी आहे. या समाजात वावरताना त्यांना असे काही लोक भेटतात ज्यांच्यामुळे आयुष्यात काहीअंशी नकारात्मकता निर्माण होते. अशा लोकांसोबत राहणे म्हणजे निश्चितच आपला अमूल्य वेळ वाया घालवणे आणि आयुष्याच्या ध्येयापासून परावृत्त होणे होय. आजच्या सदरातून कशा प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे, याबाबत जाणून घेऊया.

निंदक
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले जाते, मात्र काही निंदक आपल्याबाबत नेहमी कटकारस्थान रचत असतात. तसे निंदक दोन प्रकारचे असतात. काही निंदक आपले भले व्हावे, या हेतूने नकारात्मक गोष्टी निदर्शनास आणून देतात. परंतु दुसऱ्या प्रकारचे निंदक मात्र आपल्याला कमी लेखण्यासाठी निंदा करतात. अशा प्रकारे आपला आत्मविश्वास कमी करणारे निंदक आपल्या अवती-भोवती आढळतात. अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. कुणी जर नम्रपणे, शांत स्वरात आपली चूक लक्षात आणून देत असेल तर ते आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात घ्या. परंतु कुणी जर चारचौघांत, चढ्या आवाजात चूक दाखवून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा लोकांच्या बोलण्याने स्वत:चा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, अशा लोकांकडे दुर्लक्ष करा.   

मुखवटे 
मुखवटे घालणारी माणसे ओठात एक आणि पोटात एक असे वागणारी, नाटक करण्यात पटाईत असतात. तुमच्यासोबत असताना ते तुमच्यासमोर गोडीगुलाबीने बोलतील; परंतु पाठीमागे तुमचीच निंदानालस्ती करतील. त्यांचे छुपे हेतू तुमच्या लक्षात येत नाहीत, असे लोक ओळखून त्यांच्यापासून जपून राहा.   

हुकूमशहा
हे लोक प्रत्येक ठिकाणी स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे असतात. आत्मकेंद्री, अतिमहत्त्वाकांक्षी व नाटकी असतात. अशा लोकांपासून अंतर ठेवून राहा. आनंदावर विरजण घालणे या लोकांना चांगले जमते.   

शिकार  
स्वत:ची चूक कधीही मान्य न करणाऱ्या लोकांमध्ये राहू नका, असे लोक आपल्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडतात व सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यांचा दोष उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला तर ते पीडित असल्याचा आव आणतात. यामुळे अशा लोकांचे जास्त मित्र नसतात.   

खोटारडे  
खोटे बोलण्याच्या कलेत अशा प्रकारचे लोक बालपणापासून पारंगत असतात. गैरसमज निर्माण करण्यात व नात्यांमध्ये दुरावा तयार करण्यामागे यांचा मोठा हात असतो. कुठल्याही भीतीशिवाय हे लोक खोटं बोलतात.   

चुगलखोर
वरील पाच लोकांचा सामना करणे तुलनेने सोपे आहे; परंतु चुगलखोर लोकांचा सामना करणे अत्यंत कठीण काम आहे. इतरांविषयी आपलेपणाची भावना नसलेले हे लोक नेहमी चुगल्या करताना आढळतात. अशा चुगल्या पुढे संकटाला आमंत्रण देणाऱ्या ठरत असल्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे बरे.

Web Title: ALERT: Do not want to be associated with such people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.