मुलांच्या सर्व लसी फुकटात; यासाठी पैसे का मोजतो भाऊ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 10:47 AM2022-03-14T10:47:45+5:302022-03-14T10:48:26+5:30
vaccination of children's : शासकीय रुग्णालयाकडे लसीकरणासाठी वाढतोय कल
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : लहान मुलांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या लसी घेण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडे कल वाढू लागला आहे. जिल्हा पातळीपासून ते ग्रामीण भागापर्यंत या लसी शासकीय केंद्रांवर उपलब्ध होत असल्याने सहजरीत्या त्या घेता येऊ शकतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणास पसंती दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. खासगी रुग्णालयात लहान मुलांच्या लसी घेण्यासाठी जाणारा वर्ग वेळेची बचत व्हावी म्हणून शासकीय केंद्रांवर रांगेत उभे राहणे टाळत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसी शासकीय रुग्णालयात अगदी मोफत दिल्या जातात. तरीदेखील खासगी रुग्णालयात पैसे मोजून लसी देण्याकडे अनेक पालकांचा कल असतो. पूर्वी हे प्रमाण अधिक होते. आता ते कमी होत असून, शासकीय रुग्णालयाकडे लसीकरणासाठी पालकांचा कल वाढत आहे.
कोणती लस कधी घ्यायची भाऊ?
बीसीजी - जन्म झाल्यावर लगेच किंवा वर्षभराच्या आत
हेपॅटिटीस - जन्म झाल्यावर लगेच किंवा २४ तासांच्या आत
ओव्हरल पोलिओ पहिला- जन्म झाल्यावर लगेच किंवा पुढील १५ तासांच्या आत
ओव्हरल पोलिओ डोस १,२,३ - सहा, दहा आणि १४ व्या आठवड्यात
पेन्टा १,२,३ - सहा, दहा आणि १४ व्या आठवड्यात
गोवर - नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा १२ महिने झाल्यावर
जिल्हा रुग्णालयापासून आरोग्य केंद्रांपर्यंत उपलब्ध
लहान मुलांना देण्यात येणाऱ्या सर्वच प्रकारच्या महत्त्वाच्या लस जिल्हा रुग्णालयापासून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र अशा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील त्या सहज मुलांना देता येऊ शकतात.
खासगीत २०० रुपयांपासून लसी
खासगी रुग्णालयामध्ये देण्यात येणाऱ्या विविध लसींसाठी वेगवेगळे दर असतात. यामध्ये २०० रुपयांपासून लस उपलब्ध असते. बीसीजी, हेपॅटिटीस, पेन्टा, गोवर रुबेला यासह वेगवेगळ्या लसी २०० रुपयांपासून एक हजारापर्यंत उपलब्ध असतात. यातील अनेक लसी एकाच किमतीत देखील दिल्या जातात.