या घरगुती उपायांनी कमी करा घरातील मुंग्यांचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:03 PM2018-06-21T15:03:25+5:302018-06-21T15:03:25+5:30
घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या घरात मुंग्या पळवण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे फारच धोकादायक ठरु शकतं.
पावसाळ्यात माशांसोबत मुंग्याचाही त्रास घराघरात बघायला मिळतो. कधी लाल मुंग्या तर कधी काळ्या मुंग्या हैराण करुन सोडतात. लाल मुंग्या चावल्यास अॅलर्जी आणि वेदना होऊ शकतात. कारण मुंग्या वेगवेगळे बॅक्टेरिया सोबत घेऊन फिरतात. ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या घरात मुंग्या पळवण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे फारच धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे किटकनाशकांचा वापर करुन काही घरगुती उपायांनी मुंग्या पळवता येऊ शकतात.
1) मिठ
मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी मिठ फारच उपयोगी आहे. लादी पुसताना पाण्यात मिठ घाला. त्या मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास मुंग्या घरातून पळून जातात.
2) मिरची पावडर
घरातील ज्या कोपऱ्यात मुंग्यांची संख्या अधिक दिसेल त्या ठिकाणांवर थोडं मिरची पावडर टाका. या उपायामुळेही घरात मुंग्या येणार नाहीत. फक्त मिरची पावडर टाकल्यावर लहान मुलांवर लक्ष द्यावं लागेल.
3) लवंग
घरातील मुंग्या पळवण्यासाठी किंवा मुंग्या घरात येऊ नये यासाठी लवंग फारच फायदेशीर आहे. यासाठी घरात मुंग्या कुठून येतात हे बघण्याचीही तुम्हाला गरज पडणार नाही. घरातील कोपऱ्यांमध्ये, खिडकींमध्ये लवंग ठेवा. त्याने मुंग्या घरात येणार नाहीत.
4) गव्हाचं पीठ
घरात लाल मुंग्या शिरल्यास असतील तर ज्या ठिकाणाहून मुंग्या घरात येत आहेत, त्या ठिकाणी गव्हाचं पीठ टाका. मुंग्यांची रांग दिसेल तर त्यावरही पीठ टाका त्याने मुंग्या निघून जातील.