अंबील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 09:35 AM2018-04-10T09:35:12+5:302018-04-10T09:35:12+5:30
उन्हाळ्यात जीव पाणी पाणी करतो, मग हे खा किंवा प्या!
- शुभा प्रभू-साटम
उन्हाळ्यात सारखं पाणी पाणी होतं, खावंसं वाटत नाही. जीव पाणी पाणी करतो; पण सतत शीतपेयं तरी कशी पिणार? कारण ती पिणं हानिकारकच. नुसती सरबतं तरी किती पिणार? पोट डब्ब होतं, तहान भागत नाही ती नाहीच. पुन्हा सतत पाणी पिऊन भूक लागत नाही ती वेगळीच. या आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी परिचयाच्या आहेत. खरं तर आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे; पण हल्ली आपण तो, त्यातल्या अनेक गोष्टी विसरत चाललोय.
उन्हाळ्यातल्या तहानेसाठीचीही सोय आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये आहे. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं अंबील हा त्यासाठीचा उत्तम पर्याय आहे.
इंग्रजीत ज्याला ब्रॉथ म्हणतात तसा हा प्रकार आहे.
घट्टसर पेय. भूक आणि तहान दोन्ही शमवण्यासाठी एकदम सही. यासाठी ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणी यापैकी कोणतंही पीठ घ्यावं. उन्हाळ्यात बाजरी उष्ण पडेल असं वाटत असेल तर नाचणी उत्तम.
अंबील करताना एक मध्यम वाटी पीठ घ्यावं. साधारण आंबट ताक पिठाच्या दुप्पट घ्यावं. आलं घ्यावं. हवा असेल तर लसूणही घ्यावा. हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरं, हिंग, मीठ, साखर आणि कोथिंबीर घ्यावी. कढईत तूप तापवून त्यात जिरे आणि हिंग घालावा. नंतर लसूण मिरची आलं हे सर्व बारीक चिरून घालावं.
हे सर्व साहित्य किंचित परतून त्यात पीठ घालावं. ते चांगलं परतून घ्यावं. त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून घ्यावं. शिजवताना पिठाची कच्ची चव गेली पाहिजे इतपत ते शिजवावं.
शिजवलेलं पीठ गार करून त्यात ताक, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्यावं. आपल्या आवडीनुसार मिरची, लसूण यांचं प्रमाण ठरवावं. अंबील पोटाला थंड असते. नाचणीची असेल तर फारच छान. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ही अंबील गुणकारी आहे.
महाराष्ट्रात तसेच कर्नाटक भागात ही अंबील खाल्ली/ प्यायली जाते.
विकतच्या साखर आणि रसायनं असणाऱ्या गोष्टींऐवजी हे अस्सल देशी एनर्जी ड्रिंक केव्हाही उत्तमच!
(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com)