कोरोना 'या' देशाच्या लॅबमध्ये तयार केला गेला, चीनमध्ये नाही!... अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 08:16 PM2022-07-06T20:16:11+5:302022-07-06T20:24:46+5:30
कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे.
कोरोना महासाथीला दोन वर्षे उलटली तरी त्याच्या उगमाबाबत अद्याप समजलं नाही आहे (Coronavirus origin). सुरुवातीला वटवाघळामार्फत हा व्हायरस पसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, त्यानंतर चीनच्या वुहान लॅबमधून तो पसरल्याचा आरोप करण्यात आला (Coronavirus Leak from china wuhan lab). अद्यापही कोरोनासाठी चीनलाच जबाबदार धरलं जात आहे. अशात आता कोरोनाच्या स्रोताबाबत नवा दावा केला जातो आहे. ज्यात कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे (Coronavirus Leak from Us lab).
कोरोनासाठी अमेरिका वारंवार चीनवर आरोप करत आहे. त्याच अमेरिकेतील तज्ज्ञांनी कोरोनाच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ज्ञ जेफरी सैस यांच्या मते, हा व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधून नव्हे तर अमेरिकेच्या लॅबमधूनच पसरला आहे. सैस यांनी याआधीही कोरोना महासाथ चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांमध्ये झालेल्या प्रयोगाचा परिणाम असल्याचं सांगितलं होतं.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेफरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की दोन वर्षे लॅन्सेटससाठी एका आयोगाच्या अध्यक्षतपदी मी काम केलं आणि हा खतरनाक व्हायरस यूएस लॅब बायोटेक्नॉलॉजीतून लीक झाल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. कोरोना हा नैसर्गिक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कोरोना अमेरिकेच्या लॅबमधून पसरल्याचे पुरेसे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं सांगत त्यांनी याचा तपास करावा अशी मागणीही केली आहे.
जेफरी यांच्या दाव्याचं समर्थन चीननेही केलं आहे. चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जेफरी यांच्या दाव्याचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडनॉम घेब्रियेस यांनीही कोरोनाच्या लॅब लीक थिएरीचा तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनी कोरोना चीनच्या लॅबमधून लीक झाल्याचा उल्लेख केला होता.